मिंधे गटातील निर्ढावलेल्या आमदारांची दादागिरी काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. गैरकाम करण्यास नकार देणाऱया पोलीस अधिकाऱयांवर काही आमदार खुन्नस काढत आहेत. सांगेल ते काम न करणाऱया वरिष्ठ निरीक्षकांच्या थेट साईडला बदल्या करून तेथे मर्जीतल्या अधिकाऱयांची वर्णी लावली जात आहे. यामुळे पोलीस दलात असंतोष व्यक्त होत आहे.
माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेश कासारे यांना त्याचा फटका बसला आहे. मिंधे गटाच्या एका आमदाराचे कायद्याच्या चौकडीबाहेरचे काम करण्यास कासारे यांनी स्पष्ट नकार दिला. यावरून त्या आमदाराने वादही घातला. तरीही तो वरिष्ठ अधिकारी शरण येत नसल्याने अवघ्या दीड महिन्यात कासारे यांची तेथून उचलबांगडी केली आणि त्यांची संरक्षण व सुरक्षा विभागात बदली केली. अशाच प्रकारे पश्चिम उपनगरातील मिंधे गटातल्या एका आमदाराच्या कटकटीला वैतागून दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश पवार यांनी स्वतःहून बदली करून घेतली होती.
निवडणुकीचे मैदान आपल्यासाठी सुरक्षित असावे यासाठी मिंधेंचे आमदार अतिरेक करू लागलेत. जे प्रामाणिक व सचोटीचे पोलीस अधिकारी आहेत ते मिंध्यांच्या दादागिरीला न जुमानता स्वाभिमानी बाणा दाखवत आहेत म्हणून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे, तर काही अधिकारी हे मिंध्यांची पालखी वाहण्यास व पैशांची थैली देण्यास तयार असल्याने अशा अधिकाऱयांना मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणी पोस्टिंग दिली जात आहे. यामुळे पोलीस दलात प्रचंड अस्वस्थता पसरली असून मिंध्यांच्या आमदारांनी अतिरेक केल्यास त्याचा परिणाम त्यांना नक्की भोगावा लागेल, असा संतापदेखील बरेच अधिकारी व्यक्त करत आहेत.