माहिम विधानसभा मतदारसंघात प्रभादेवी ते माहिमपर्यंत विविध धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांना अनधिकृत दुकानांचा गराडा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून महापालिकेने श्री सिद्धिविनायक मंदिराशेजारी मागील 50 वर्षांहून अधिक काळापासून व्यवसाय करणाऱया सुभाष कोरडे या 76 वर्षीय मराठी माणसाच्या दुकानावरच बुलडोझर फिरवत त्यांचा रोजगार हिरावला आहे.
वयाच्या दुसऱया वर्षापासून अंध असलेल्या सुभाष कोरडे यांनी 1969 साली श्री सिद्धिविनायक मंदिराबाहेर लॉटरीचा व्यवसाय सुरू केला. अंध असूनही दररोज बोरिवलीहून लोकलने प्रवास करून ते दादरमध्ये लॉटरी विकण्यासाठी येत होते. कालांतराने लॉटरी बंद पडली, पण कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी याच स्टॉलमध्ये अगरबत्ती, पूजेचे सामान, गणपती बाप्पाच्या मूर्ती विकण्यास सुरुवात केली. पत्नीसह पदरात तीन मुली असल्याने त्यांना दुकान चालविणे गरजेचे होते. या दुकानाच्या जोरावरच त्यांनी मुलींचे शिक्षण, त्यांची लग्ने लावली. दुकान सुरू केल्यापासून आतापर्यंत अनेकदा त्यांनी या स्टॉलच्या परवान्यासाठी पालिका प्रशासनाकडे विनंती अर्ज केले आहेत. मात्र इतक्या वर्षांत एकदाही त्यांच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार झालेला नाही.
माझ्यानंतर अनेक परप्रांतीयांनी श्री सिद्धिविनायकाच्या आवारात दुकान थाटून त्यांना परवानाही मिळाला, पण मलाच परवान्यासाठी इतकी वर्षे ताटकळत का ठेवले? असा सवालही सुभाष कोरडे यांनी उपस्थित केला आहे.
कारवाई कोणाच्या सांगण्यावरून?
श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीनेही मंदिराबाहेरील स्टॉल्सविषयी पूर्वी कधीही तक्रार केली नव्हती. मग आताच मंदिराबाहेरील दुकानांवर ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरून केली जात आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोरडे यांच्यासह अन्य दोन फुलविक्रेत्यांचे स्टॉल्सही पाडण्यात आले. स्टॉल पाडण्यापूर्वी कोणतीही नोटीस दिलेली नव्हती. तसेच कोरडे यांना जबरदस्तीने दुकानाबाहेर काढण्यात आले. दुकानातील त्यांचा सर्व माल आणि धंद्याची रोकडही जप्त करण्यात आल्याचा आरोप कोरडे यांनी केला आहे.