Solapur news – सिद्धेश्वर मंदिर गाभारा सोन्या-चांदीने उजळला

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची महायात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. या महायात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धरामेश्वरांचा गाभारा सोन्या-चांदीने मढविलेला असून, सुवर्णांनी लख्ख असा उजळला आहे. ‘सुवर्ण सिद्धेश्वर’ ही संकल्पना समोर ठेवून मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.

नऊ वर्षांपूर्वी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी व विश्वस्थांनी सुवर्ण सिद्धेश्वरांची संकल्पना ठेवून कार्याला सुरुवात केली. भाविकांनी, सहकारी संस्थांनी सोने-चांदी व रोख अशा स्वरूपात भरघोस देणगी दिल्याने सुवर्ण सिद्धेश्वराची संकल्पना मूर्त स्वरूपात येत आहे. मंदिरातील संपूर्ण भागाला सुशोभित करण्यासाठी 1200 किलो चांदी आणि 250 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या सोन्या- चांदीच्या लेपाने गाभारा उजळून निघाला आहे.

यापूर्वीच मंदिराच्या शिखरावरील सुवर्ण कळसाचे काम पूर्ण झाले असून, यंदाच्या वर्षी गाभाऱ्याचे काम पूर्णत्वास येत आहे. डोळे दिपवून सोडणारे गाभाऱ्यातील नक्षीकाम राजस्थान येथील कारागीर करीत आहेत. देशात पंजाबमधील सुवर्ण मंदिरानंतर सोलापुरातील सुवर्ण सिद्धेश्वर मंदिर हे सर्वांना दिपविणारे आहे.