>> सिद्धार्थ म्हात्रे
छोट्या छोट्या व्याख्यांपासून ते भारतीय नातेसंबंध, कुटुंब संस्था, विवाह संस्था यांसारख्या अतिशय गुंतागुंतीच्या असलेल्या या संस्कृतीविषयक दालनाच्या समग्र अभ्यासाचा परिपाक असलेले पुस्तक `Kinship Organization in India` आणि या पुस्तकाची हृद्य अर्पणपत्रिका.
काही पुस्तकं खरी तर योगायोगाने हाती येतात. आपली आवड म्हणून किंवा अगदी काही विषयातील कुतूहल म्हणून आपण पुस्तक वाचायला घेतो. अनेकदा वेगळ्या विषयावरील पुस्तकं संपूर्ण वाचूनही होत नाहीत, पण एका व्यापक विषयाची ओळख मात्र होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असताना विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात जाणं सहज शक्य होतं. इथेच मला एक असं पुस्तक मिळालं ते त्याच्या विषयासह अर्पणपत्रिकेमुळे लक्षात राहिलं. ते पुस्तक म्हणजे इरावती कर्वे यांचं `Kinship Organization in India`!
इरावतीबाईंची पहिलीवहिली ओळख झाली ती त्यांच्या ‘आमची संस्कृती’ या पुस्तकातून. ‘मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी, पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती.’ संस्कृतीची अशी सोपी ओळख करून देणाऱया आणि तरीही त्याची व्यापकता सांगणाऱया इरावतीबाई मला तेव्हाच आवडल्या होत्या. पुढे या व्याख्येसारखी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्यापकता अधिक जाणवत गेली आणि वेळोवेळी त्यातून प्रेरणा मिळून त्यांनी मानववंशशास्त्र या विषयात केलेल्या कार्याविषयी अप्रूप वाटत गेलं.
मी इरावतीबाईंची अगदी दोनच पुस्तकं वाचलेली आहेत. एक ‘परिपूर्ती’ आणि दुसरं ‘युगांत!’ एकदा विद्यापीठात सहज कामासाठी म्हणून गेलो असताना तिथून जयकर ग्रंथालयात गेलो होतो. तिथे एक तासभर पुस्तकं शोधत, कधी त्यातली काही पानं वाचत मला इरावतीबाईंचं हे 1968 साली प्रकाशित झालेलं `Kinship Organization in India` पुस्तक मिळालं. पुस्तक वाचायचं नक्की केलं आणि घरी घेऊन आलो. अर्थात पुस्तकाची पाच-सहा प्रकरणंच वाचून झाली आणि वाचन अपूर्णच राहिलं, पण पुस्तक खूप आवडलं. बाईंच्या अभ्यासाच्या एका व्यापक पटाने मी थक्क झालो. छोटय़ा छोटय़ा व्याख्यांपासून ते भारतीय नातेसंबंध, कुटुंब संस्था, विवाह संस्था यांसारख्या अतिशय गुंतागुंतीच्या असलेल्या या संस्कृतीविषयक दालनाच्या समग्र अभ्यासाचा परिपाक असलेले हे पुस्तक बाईंच्या ठायी असलेल्या साक्षेपी संशोधकाची साक्ष देतं आणि हे पुस्तक अजून एका कारणासाठी आवडलं ते म्हणजे पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेसाठी!
प्रचंड जिज्ञासू वृत्ती, अपार कुतूहल आणि या सगळ्याला अफाट बुद्धिमत्तेची जोड याच जोरावर इरावतीबाईंनी आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला प्रभावशाली कर्तृत्वाचं कोंदण दिलं. इतर चारचौघींसारखं केवळ बी.ए आणि एम.ए न करता मानववंशशास्त्रासारख्या त्या काळी नव्या असलेल्या विषयात त्यांनी करीअर करून जसं आपलं वेगळेपण दाखवून दिलं तसंच वेगळेपण त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातदेखील जपलं. संस्कृतीची त्यांना प्रतीत झालेली प्रतिमा त्यांनी कायमच आपल्या कृतीतून दाखवून दिली आणि ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं.
अर्पणपत्रिकेचा फोटो पहा. कमी शब्द, पण अर्पण करण्याचा अपूर्व आनंद देणाऱी आणि संस्कृतीचे रूपक असणारी एक हृद्य कृती! मग ती अर्पणपत्रिका वाचताना लक्षात येतं की, हे पुस्तक त्यांनी फक्त त्यांच्या पतीला अर्पण केलेलं नाही, तर त्यांच्यातील सख्याला, जो कायम त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहिला, त्यालाही अर्पण केलं आहे… आणि खरं सांगायचं तर ही अर्पणपत्रिका वाचताना मला इरावतीबाईंचा प्रसन्न, हसरा फोटो आठवतोय. आपल्या मागे आपण केलेली कृतीही राहणार असते. ती सुरेख असेल तर संस्मरणीय होते. एखाद्या पुस्तकात कुणाचा तरी आदरपूर्वक, प्रेमपूर्वक, मैत्रीपूर्वक किंवा अगदी सौजन्य म्हणून केलेला उल्लेखदेखील एका पानावर कायमचा लिहिला जातो तेव्हा ती केवळ एक स्मृती राहत नाही, तर हृद्य कृती होते.
इरावतीबाईंनी जगभरच्या नद्या, त्यांचे प्रवाह अनुभवले आणि अभ्यासलेसुद्धा. म्यानमारच्या नदीचं नाव तर जन्मभरच त्यांच्या सोबत राहिलं. पुढे बर्लिनच्या स्प्री (Spree) नदीकाठी बसून त्यांनी सुंदर स्वप्नं पाहिली असणार, पण त्यांना अखेरपर्यंत ओढ राहिली ती ‘भारतीय संस्कृती’ नामक पुराण नदीची. त्या अभ्यासाचा ध्यास त्यांनी कायम घेतला आणि पूर्णत्वाला नेला. मानववंशशास्त्रात त्यांनी केलेलं कार्य आणि ग्रंथ आजही प्रमाण मानले जातात आणि पुढेही मानले जातील. संस्कृतीचे संचित सोबत घेऊन आपल्याला हवे असलेले वळण धाडसाने, आत्मविश्वासाने आणि लढाऊ बाण्याने देणाऱया, खंबीर आणि निर्मळ प्रवाहीपण जपणाऱया, नुसतं नावातच नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातदेखील नदी झालेल्या इरावतीबाईंकडून मला नेहमीच प्रेरणा मिळत असते. बदलांचे परीघ जिथे कायमच रुंदावत असतात, नव्या व्याख्या जिथे सीमोल्लंघनाची वाट दाखवत असतात, तिथे तुमच्या निर्धारांना बळ देणारी इरावतीबाईंसारखी तेजस्वी व्यक्तिमत्त्वं सोबत असू द्यावीत.