अधोरेखित- विनम्र स्मरणाची अर्पणपत्रिका…

>> सिद्धार्थ म्हात्रे

पुस्तक वाचताना… मनापासून वाचताना… अगदी पहिल्या पानापासून वाचताना… नव्या कागदाचा कोरा करकरीत स्पर्श अनुभवताना… मुखपृष्ठ न्याहाळताना अन् पुढे तिची अर्पणपत्रिका धुंडाळताना… वाचलेलं मनाच्या तळाशी अधोरेखित होत जातं. अशाच काही रुतलेल्या, रुजलेल्या अर्पणपत्रिका. या सदरातून वाचकांच्या भेटीस.

एखाद्या विषयावर एखादं पुस्तक लिहीत असताना त्या विषयातील तज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन लेखकाला लाभतं आणि मग ते पुस्तक त्याच व्यक्तीला अर्पण केलं जातं. ‘मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा…’ या माधव शिरवळकर लिखित पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेची कथा काहीशी अशीच आहे. मुळात हे पुस्तक म्हणजे शिरवळकरांच्या ‘शहर मुंबई’ या साप्ताहिकातील सदर लेखांचा संग्रह आहे. मुंबईतील ब्रिटिश इतिहास, ब्रिटिश अधिकारी आणि गव्हर्नर या सगळ्या माणसांचा, त्यांच्या कार्याचा तर कधी त्यांनी हिंदुस्थानवर लिहिलेल्या पुस्तकांचा आढावा या पुस्तकात घेण्यात आलेला आहे. मुंबईचा इतिहास हा विषय ज्यांचा अधिकाराचा आणि अगदी आयुष्यभर अभ्यासाचा होता त्या डॉ. अरुण टिकेकरांनी प्रस्तुत लेखकाला या लेखांचं पुस्तक करण्याची सूचना केली होती. शिरवळकरांना मुंबईच्या इतिहासासंबंधी अनेक नव्या गोष्टी टिकेकरांकडून समजत असत. पुस्तकाची सूचना प्रत्यक्षात येण्यासाठी त्यांनी कामही सुरू केलं, पण दुर्दैवाने त्याआधीच डॉ. टिकेकरांचे निधन झालं. शिरवळकरांनी हे पुस्तक अतिशय आदरपूर्वक आणि विनम्रतेने टिकेकरांना अर्पण केले आहे.

पोर्तुगीजांकडून ‘मुंबई’ ब्रिटिशांकडे गेली आणि तेव्हापासूनच खरं या गावाचं सुसज्ज शहर होऊ लागलं. हिंदुस्थानातील ब्रिटिश इतिहास जुलमी होताच, परंतु या पुस्तकातून आपल्याला काही अशी ब्रिटिश माणसं भेटतात, ज्यांनी हे शहर वाढवलं. यात सनावळ्यांची जंत्री नाही की ऐतिहासिक माहितीची मोठाली प्रकरणे नाहीत. आहेत त्या रंजक कथा!

मुंबईच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वर्तुळाची भुरळ अनेक ब्रिटिश अधिकाऱयांना पडली. अनेक अधिकारी उत्तम मराठी बोलत असत. बऱयाच जणांनी मुंबईवर पुस्तकं लिहिली. मुंबईच्या रस्त्यांच्या नावाचा इतिहास सांगणारे ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे त्या वेळचे संपादक सॅम्युअल टी. शेपार्ड, मुंबईचा ब्रिटिश पोलीस कमिशनर एडवर्डस् यांचे ‘बाय वेज ऑफ बॉम्बे’, मराठी भाषेच्या प्रेमात पडून पुढे मराठी-इंग्रजी शब्दकोश लिहिणारे मोल्सवर्थ, कोकणावर प्रेम करणाऱया क्रॉफर्डने ‘लेजंड्स ऑफ कोकण’ हे पुस्तक लिहिले होते. 1853 साली हिंदुस्थानातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे अशी धावली. लॉर्ड फाकलंड हे त्या वेळी मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांच्या पत्नीने लेडी अमेलिया फॉकलंडने या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यांनी या रेल्वे प्रवासाचा अनुभव आपल्या ‘च्याव च्याव’ या हिंदुस्थानवरील तिच्या पुस्तकात लिहिला आहे. एकंदरीतच शिरवळकरांचे हे पुस्तक म्हणजे फक्त जुन्या मुंबईची सफर नाही. यात इतिहास आहे, रंजक गोष्टी आहेत, जुन्या मुंबईचे वर्णन आहे आणि मुख्य आहेत ती माणसं. कधीकाळी शहराच्या उन्नतीसाठी योगदान दिलेली ब्रिटिश माणसं. कुणी लष्करी कर्तृत्व गाजवलेलं तर कुणी कमिशनर म्हणून यशस्वीपणे कार्य केलेलं, कधी मराठी भाषेसाठी योगदान दिलेली माणसं तर कधी मुंबई शहरावर पुस्तकं लिहून दस्तऐवजीकरण करणारी माणसं. काही अस्सल मुंबईकर माणसांच्या कथाही या पुस्तकात वाचायला मिळतात. जमशेदजी जिजीभॉय आणि त्यांचा श्रीमंत मित्र आद्य कोळी झुरन पाटील यांची गोष्ट त्यांच्या इतकीच श्रीमंत आहे. ते इतके श्रीमंत होते की, त्या वेळी गव्हर्नर साहेबांच्या विनंतीवरून त्यांनी सरकारला मदत केली होती. फ्रामजी कावसजी बानाजी हा एक धाडसी पारशी माणूस. 1829 साली या माणसाने ब्रिटिश सरकारकडून त्या वेळी जंगल असलेले पवई 4001 रुपये वार्षिक भाडय़ावर घेतली होती. फ्रामजीचं धाडस आणि जिद्द पुस्तकातूनच वाचायला हवी. तसेच ‘खडा पारशी’ या पुतळ्याची गोष्ट, सर फिरोजशहा मेहता, नाना शंकरशेट यांचे उल्लेखही वाचायला मिळतात.

शिरवळकरांच्या पुस्तकात फक्त अर्पणपत्रिकेत टिकेकर आहेत असं नव्हे, तर प्रस्तावना लिहिणाऱया शरद काळे यांनीदेखील प्रस्तावनेच्या अगदी सुरुवातीलाच टिकेकरांचा उल्लेख केला आहे. ते लिहितात, ‘मुंबईविषयीची सविस्तर माहिती व सखोल अभ्यास याबाबतीत मी डॉ. अरुण टिकेकरांच्या पासंगाला पुरणार नाही, परंतु माधवरावांच्या स्नेहपूर्ण आग्रहामुळे प्रस्तावना लिहिण्याचे धाडस करत आहे.’ साहित्यिक व्यवहारात सन्मानाने केलेलं हे विनम्र स्मरण म्हणूनच मला विशेष वाटलं.

मुंबईत फिरताना जुने – नवे संदर्भ रोजच एकत्र भेटत असतात आणि पुस्तक वाचताना जे संदर्भ नव्याने कळतात ते अगदी आपल्या आजूबाजूलाच असतात. खास करून दक्षिण मुंबईत. शहरीकरणाचा परमोच्च बिंदू गाठून झुकलेलं हे शहर अनेक नामिक-अनामिक लोकांच्या सहभागातून उभं राहिलं आहे. या पुस्तकातून ज्या व्यक्तींनी यासाठी योगदान दिलं त्या कर्तृत्ववान माणसाचं स्मरण आहे, अर्पणपत्रिकेतही स्मरण आहे. हल्ली एखाद्याचे ऋण आपण किती सहज विसरून जातो. अशा या काळात ही काही स्मरणाची पाने विनम्रतेची वाट सुंदर असते हेच सांगतायेत.

[email protected]

मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा…
लेखक ः माधव शिरवळकर
प्रकाशक ः संगणक प्रकाशन