अच्छे दिन दहा वर्षात आलेच नाहीत, मोदी खोटारडे पंतप्रधान; सिद्धरामय्या यांचा घणाघात

पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढले. महागाई शिखरावर नेली. अच्छे दिन दहा वर्षात आलेच नाहीत. सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुखकारक झाले नाही. खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली. नरेंद्र मोदी देशातील सगळ्यात खोटारडे पंतप्रधान आहेत, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यातील आठवडा बाजार मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, एम. बी. पाटील, खा. प्रणिती शिंदे, बबनराव आवताडे, नंदकुमार पवार, तानाजी खरात, नितीन पाटील, राजाराम जगताप, मारुती वाकडे, सुरेश कोळेकर, भारत बेदरे, दयानंद सोनगे, जयश्री भालके आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सिद्धरामय्या यांनी सांगितले की, स्व. भारत भालके या मतदारसंघात तीन वेळा आमदार होते. आता भगीरथ भालके यांना विजयी करा. महाराष्ट्रात काँग्रेसला आशिर्वाद द्या. महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि गोरगरिबांना चांगले दिवस येतील. काँग्रेस सर्वांना सोबतीने घेऊन जाणारा पक्ष असून जाती धर्मभेद करत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आणले. यात सगळ्या जातींना समान संधी मिळाली आहे. काँग्रेसचे धोरण तेच आहे. भाजप संविधान न मानणारा पक्ष आहे. नेहरू ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत गोरगरिबांना जपणारा काँग्रेस पक्ष आहे. भाजप केंद्रात सत्तेत आहे. पण गोरगरिबांचे कधीही हित पाहिले नाही. देशात आलेली विषमता कमी करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. भाजप ही उच्चवर्णीय व श्रीमंत लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कोणत्याही परिस्थितीत महिला व गरिबांना जपले नाही. अदानी, अंबानी आशा भांडवलशाहीला मदत केली, अशी टीका सिद्धरामय्या यांनी केली

देशातील शेतकरी संकटात आहेत. त्यांचासाठी एकही कार्यक्रम भाजपने केला नाही. शेतकरी कर्जमाफी कधीच केली नाही. काँग्रेसने 70 हजार कोटींची कर्जमाफी केली. ऑपरेशन लोटस राबवत मागच्या दाराने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला. कोट्यवधी रुपये देऊन आमदार खरेदी केले, अशी टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.

यावेळी उमेदवार भगीरथ भालके म्हणाले की, मराठा, धनगर आरक्षण प्रलंबित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाला. संत चोखामेळा, संत बसवेश्वर स्मारक झाले नाही. तालुक्यातील दडपशाही, गुंडगिरी, अडवणूक, पिळवणूक हे दिवस बदलण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणावे लागेल, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.