पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक काँग्रेसवर केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधानाचं भाषण हा निव्वळ खोटारडेपणाचा कळस आहे. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत अन्यथा देशाची माफी मागावी, अशी मागणी सिद्धरामय्या यांनी केली आहे.
पतंप्रधान मोदी यांनी मंगळवारी राजस्थानच्या टोंक येथील प्रचारसभेत काँग्रेसवर आरोप केले होते. काँग्रेसने मुस्लिमांना आरक्षण दिल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. या आरोपांचं खंडन करताना काँग्रेसने त्यांच्यावल खोटारडेपणा केल्याचा पलटवार केला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक्सपोस्टवर मोदी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मागासवर्ग आणि दलितांचं आरक्षण हे मुसलमानांना दिल्याचा दावा मोदींनी केला आहे. हे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. ज्या गोष्टीविषयी तुम्हाला माहीतही नाही. तसंच, या विधानावरून मोदींची भीती स्पष्ट होते. पंतप्रधानांनी आपल्या दाव्याची पुष्टी करणारे पुरावे सादर करावेत अन्यथा देशाची माफी मागावी, असं सिद्धरामय्या यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसने मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीयांचं आरक्षण काढण्याविषयी कधीही म्हटलेलं नाही. कोणत्याही काँग्रेसप्रणित राज्य सरकारने असं धोरण राबवलेलं नाही. जर या दाव्या संदर्भात काही अधिकृत दस्तऐवज उपलब्ध असेल तर तो मोदींनी देशासमोर सादर करावा. संवैधानिक आरक्षणात मनमानी पद्धतीने संशोधन करण्यात येऊ शकत नाही. आरक्षणात संशोधन फक्त सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालाच्या आधारे केलं जाऊ शकतं, असंही सिद्धरामय्या या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.