मिंधेंच्या खासदाराचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा; पोलिसांची हप्ते वसुली, सामान्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वतःकडेच ठेवले आहे. त्यामुळे महायुतीत नाराजी व्यक्त होत होती. गृह खाते आपल्याला मिळावे अशी मिंधे गटाची मागणी होती. आता मिंधेगटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस हप्तेखारी करत असल्याने सरकार बदनाम होत असल्याची टीका करत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे. याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

पिंपरी चिंचवड सामान्य जनतेच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदवून घेतल्या जात नाही, त्यांना अनेक तास रखडवत ठेवले जाते. त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते. पोलीस सर्वसामान्य जनतेच्या समस्येऐवजी मलईदार समस्येकडे लक्ष देतात, अशा अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. याबाबत आपण पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना पत्र देत याबाबतीची सर्व माहिती दिली आहे. पोलीसांनी सर्वसामान्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे आणि जनतेला सुरक्षा पुरवावी, अशी मागणीही बारणे यांनी केली आहे.

सर्व सामान्य नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यानंतर त्याची दखल घेतली जात नाही, त्याला अपमानस्पद वागणूक दिली जाते, त्याला खूप वेळ त्या पोलीस ठाण्यात बसून ठेवलं जातं आणि तक्रार घेण्यासाठी दिरंगाई केली जाते, असे अनेक प्रकार घडत आहेत. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नाही या अनुषंगाने आपण पत्र दिलेले आहे. एकंदरच पोलिसांचा कारभार जर पाहिला तर कुणाचीतरी पाठीराखण करण्याच्या त्यांचा हेतू दिसतो, हे नाकारून चालणार नाही. काही प्रमाणामध्ये ज्या जमिनीच्या केसेस असतात किंवा त्या ठिकाणी काही प्रकारे अतिक्रमण केलं जातं किंवा बांधकाम व्यवसायिकांच्या केस अशा मलईदार प्रश्नांकडे पोलीस जास्त लक्ष घालतात. मात्र, सर्वसामान्य माणसाच्या तक्रारीमध्ये लक्ष घालत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

काही पोलीस ठाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी पिंपरी चिंचवडच्या आहेत. हिंजवडी पोलीस ठाणे, वाकड पोलीस ठाणे, काळेवाडी पोलीस ठाणे, सांगवी पोलीस ठाणे यांच्याही तक्रारी आहेत. त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र देत थेट गृह विभाग आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे. याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.