ई-बस पुरविणाऱ्या कंपनीला दंड ठोठावण्याचा दिखावाच; श्रीरंग बरगे यांचा आरोप

करार करूनही एसटीला ई बसेस न देणाऱ्या कंपनीला दंड ठोठावण्यापेक्षा पाच महिन्यांच्या प्रवासी उत्पन्नाची भरपाई घ्या, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

तब्बल 5150 ई बसेस पंत्राटावर घेण्याचा करार महामंडाळाने एका कंपनीशी केला आहे. 13 फेब्रुवारी 2024 रोजी या बसेसचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी केवळ 20 बसेस सेवेत दाखल झाल्या.

कंपनी दर महिन्याला 215 बसेस देणार होती. मार्चपासून आतापर्यंत एकही बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेली नाही. मार्च 2024 ते जुलै 2024 या कालावधीत दरदिवशी बुडालेले सरासरी 16000 रुपये प्रवासी उत्पन्न कंपनीकडून वसूल करावे, अशी मागणी श्रीरंग बरगे यांनी केली आहे.