
आंध्र प्रदेशातून कोळंबीची सर्वाधिक निर्यात होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानातील निर्यातीवर 26 टक्के टॅरिफ लावल्याने आंध्रचा कोळंबी व्यवसाय संकटात आला. मात्र नुकतीच ट्रम्प यांनी टॅरिफ घोषणेला तीन महिन्यांसाठी स्थगिती दिली. त्यामुळे कृषी क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने एक पॅनेल गठीत केले आहे. 16 सदस्यीय पॅनेल देशातील सागरी अन्न उत्पादनाला येणाऱ्या आव्हानांचा अभ्यास करून मार्ग काढणार आहे. अमेरिकेच्या टॅरिफचा फटका कोळंबी व्यवसायाला बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
नव्याने गठीत झालेले पॅनेल आता युरोपियन युनियन, चीन आणि जपानमध्ये हिंदुस्थानी कोळंबीची निर्यात वाढवण्यासाठी पावले उचलणार आहे. पॅनेलमध्ये प्रमुख सीफूड आणि फीड मिल उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी आहेत. हिंदुस्थान आणि इक्वेडोरची कोळंबी उत्पादन पद्धती व निर्यातीचा अभ्यास या संबंधाने पॅनेल काम करणार आहे. समितीला पाच दिवसांत शुल्क सवलतीच्या उपाययोजना आणि त्यावरील उपाययोजनांच्या परिणामांवर प्राथमिक अहवाल व तीन आठवड्यांत दीर्घकालीन धोरणात्मक उपाययोजनांवर व्यापक अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
इक्वेडोर प्रमुख स्पर्धक
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के अतिरिक्त कर लादल्यानंतर आणि इक्वेडोरसाठी 10 टक्के शुल्क कायम ठेवले आहे. त्यामुळे इक्वेडोर हा कोळंबी निर्यातीत हिंदुस्थानसाठी प्रमुख स्पर्धक बनला आहे. आंध्र प्रदेशातून सर्वात जास्त प्रमाणात कोळंबी निर्यात होते.