न्यूझीलंडने आधीच मालिका खिशात घातल्यामुळे औपचारिकता असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात कुसल परेराने नव्या वर्षातील शतकी खेळीचा श्रीगणेशा करत श्रीलंकेला 7 धावांनी थरारक विजय मिळवून दिला. श्रीलंकेच्या 219 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 211 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
न्यूझीलंडने टॉस जिंकून श्रीलंकेला फलंदाजी दिली. पथुम निस्सांका आणि कुसल मेंडिस डावाची दणदणीत सुरुवात करण्यात अपयशी ठरले. दोघांनी वेगात धावा केल्या, पण फलकावर 42 धावा लागल्यानंतर दोघेही बाद झाले. मात्र त्यानंतर कुसल परेराने आपल्या 46 चेंडूंतील खेळीत किवींच्या गोलंदाजीला पह्डून काढताना 13 चौकारांसह 4 षटकार खेचत 101 धावांची घणाघाती खेळी केली. त्याने कर्णधार चरिथ असलंकासह चौथ्या विकेटसाठी 100 धावांची भागी केल्यामुळे श्रीलंकेला दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. असलंकाने 24 चेंडूंत 5 षटकारांची बरसात करताना 46 धावा ठोकल्या. विजयाची हॅटट्रिक करण्याच्या ध्येयाने यजमान न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरला आणि त्यांच्या टीम रॉबिनसन आणि रचिन रवींद्रने 7 षटकांतच 81 धावांची सलामी देत विजयाच्या दिशेने पावले टाकली. रचिनने 69 धावांची घणाघाती खेळी करत संघाचे विजयाचे आव्हान जिवंत ठेवले. मात्र तो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ धावांचा वेग वाढवण्यात काहीसा कमी पडला. फलकावर 170 धावा लागल्या तेव्हा न्यूझीलंडने आपला सातवा फलंदाज गमावला. 22 चेंडूंत 49 धावांची गरज असताना कर्णधार मिचेल सॅण्टनर आणि झॅकरी पह्क्सने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, पण दोघांनाही मोठे फटके खेळण्यात यश न लाभल्यामुळे न्यूझीलंडला 7 धावांनी पराभव सहन करावा लागला. दोघांनी शेवटच्या 22 चेंडूंत केवळ 2 चौकार आणि 2 षटकारच ठोकले.