दखल – सकारात्मक उपदेश

>> श्रीकांत पाटील

‘श्रीमान’ हा पत्रकार दुर्गेश आखाडे यांचा कथासंग्रह वाचला. दहा कथांचा हा संग्रह ग्रामीण जीवनावरील असला तरी प्रत्येक कथेतून सकारात्मक उपदेश पुढे गेलाय. खरे तर दुर्गेशजी हे पत्रकार, रोज नवीन बातम्या…म्हणजे घटना त्यांच्यासमोर येतात. काही जीवघेण्या, हृदयस्पर्शी, प्रेमळ, कौटुंबिक, राजकीय अशा अनेक घटना बातमीच्या स्वरूपात मांडाव्या लागतात. त्यातील निवडक घटना ज्यात नाटय़ आहे, संदेश आहे अशा निवडून त्या कथेच्या बंधनात त्यांनी अडकवून टाकल्या आणि संग्रह तयार झाला. पुण्यातील डायमंड पब्लिकेशन्सने हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे. कथा अगदी साध्या-सोप्या, पण मन हेलावून टाकणाऱ्या आणि समाजाला संदेश पोहोचविणाऱ्या आहेत. अलंकारिक भाषेने नटलेल्या नसल्या तरी एक ग्रामीण बाज प्रत्येक कथेमध्ये आढळून येतो. काही कथा तर सत्य घटनेवर आधारित आहेत.

कोणतेही मोठे धक्का तंत्र न वापरता वाचकांच्या मनापर्यंत लेखक पोहोचला आहे. सोप्या सुटसुटीत भाषेत विषयाचा गाभा लक्षात घेऊन त्या-त्या कथेला योग्य न्याय देण्याचे काम लेखकाने केले आहे.

यातील सर्वच कथा चांगल्या आहेत. त्यांची ‘दुरावा’ ही कथा स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने विजेती ठरली. याचाच अर्थ त्यांना कथा लेखनाचा धागा सापडलाय आणि परीक्षकांनाही दुरावा निर्माण करता आला नाही हे विशेष. मलासुद्धा ही कथा खूप आवडली. कारण अनपेक्षित असा कथेचा शेवट त्यांनी केलाय. तो तिच्या मार्गातून कायमचा परदेशी निघून जाईल असे वाटले नव्हते, पण लेखकाने हा दुरावा मात्र छान मांडलाय. प्रत्येक कथेतील नायक किंवा नायिका या आपल्या दुःखाचे प्रदर्शन न करता योग्य त्या मार्गाने कष्ट सोसून, दुःख भोगून पुढे जाताना दिसतात आणि आपल्या मनातल्या ध्येयाकडे झोकून देतात व यशस्वी होतात.

हे यशाकडे जाणे म्हणजे आपल्याबरोबर समाजालाही ध्येयाकडे वाटचाल करायला लावणारे आहे. प्रत्येक कथेतील पात्रांची जिद्द व चिकाटी एवढी अतूट आहे की, त्यातून पुढे सकारात्मक घटना दिसून येतात. कथेची मांडणी लेखकाने सुसंगत केलेली असून त्यात यशस्वी झाला आहे. अशाच साध्या व सुंदर जीवनाच्या कथा त्यांच्याकडून लिहिल्या जाव्यात यासाठी त्यांना खूप शुभेच्छा.