मिंधे सरकार हे गुंडांचे, समाजपंटकांचे सरकार आहे या आरोपाला आज आणखी पुष्टी मिळाली. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने आज मिंधे गटात प्रवेश केला. मिंधे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मोठय़ा सन्मानाने पांगारकरचे पक्षात स्वागत केले, पण त्यावरून टीकेची झोड उठताच मिंधे गटाची गोची झाली.
पांगारकरने मिंधे गटात प्रवेश केल्यानंतर त्याला लगेचच जालना विधानसभा प्रमुख बनवण्यात आले होते, परंतु त्यानंतर मिंधे गटावर जोरदार टीका होऊ लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांगारकर याची नियुक्ती स्थगित केली. पत्रकार गौरी लंकेश यांची 2017 मध्ये हत्या झाली होती. त्या प्रकरणात श्रीकांत पांगारकर हा तीन वर्षे तुरुंगात होता. पांगारकर याने मिंधे गटात प्रवेश करून जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.