>> श्रीकांत आंब्रे
जेष्ठ साहित्यिक विश्वास वसेकर यांची ‘मृत्यो, नको येऊ की!’ ही डायरीवजा लघुकादंबरी म्हणजे एखाद्या जीवघेण्या प्रसंगातून किती खुसखुशीत विनोदाची पखरण करता येते याचा प्रत्ययकारी नमुना. लेखकाला चावलेला मोकाट कुत्रा व त्यामुळे डोळ्यांसमोर उभी ठाकलेली साक्षात मृत्यूची भीती या मध्यवर्ती कल्पनेच्या अनुभवातून फुलवलेली ही डार्क कॉमेडीच्या धर्तीवरील ‘बार्क कॉमेडी’च म्हणावी लागेल.
पुण्यातल्या रहदारीच्या रस्त्यावर लेखक सायकलवरून जात असताना एक मोकाट कुत्रा त्याच्या पायाला चावतो. धनुर्वाताचे इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर पुचे दहा दिवस त्या कुत्र्यावर लक्ष ठेवायला सांगतात. त्यानंतरच्या दहा दिवसांत लेखकाने मृत्यूचं भय बाळगत सलग दहा दिवसांत डायरीत केलेल्या नोंदींमधून अनुभवलेल्या घटनांचं वर्णन वाचून हसावं की त्याच्या त्या काळातील करामती आणि हतबलता पाहून त्याची कीव करावी असं वाटल्यावाचून राहात नाही. ही घटना तशी छोटी, पण तळापासून वरपर्यंत अंतःकरण हेलावणारी. कुत्रा चावल्यानंतर होणारा ‘हायड्रोफिया’ हा रोगच असा की, तो झाल्यानंतर मरणाशिवाय पर्याय नसतो. आपण लाख म्हणालो की, मृत्यो, नको येऊ की! तरी आपलं काही चालत नाही, हा लेखकाचा दृश्वास असतो. तसं पाहिलं तर ही घटना बारा वर्षांपूर्वीची आहे. पण चार महिन्यांपूर्वी पुण्यातीलच रस्त्यावरून ते सायकलने जात असता अचानक एक काळं कुत्रं त्यांचा पाठलाग करतं, त्याची पँट पकडतं. पण रस्त्यावर पडून मुका मार लागण्यापलीकडे त्यांना काही होत नाही. मात्र या प्रसंगाने त्यांच्या बारा वर्षांपूर्वी चावलेल्या कुत्र्याच्या स्मृती जाग्या होतात. त्या प्रसंगाच्या नोंदी केलेल्या डायरीचं बाड ते शोधून कातीच डायरी कादंबरी रूपातून आपल्यासमोर येते. पुन्हा त्या आठवणी त्यांचं जीवन व्यापून टाकतात.
त्या थरारक अनुभवातील थ्रिल आणि यातून उडणाऱ्या हलक्या फुलक्या कारंज्यातील शिडकावे वाचकांच्या मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहात नाहीत. एरव्ही शांत असणारा तो कुत्रा फक्त सायकलस्वारांवरच खुन्नस का कात्याचं रहस्यही उत्कंठावर्धक आहे.
माणसांप्रमाणे मोकाट कुत्र्यांचंही स्वतःचे नियम पाळणारं एक अनुभव विश्व आहे, त्यातून पुण्यातील मोकाट कुत्र्यांचेही कायदेकानून असावेत याची झलक अनेक वेळा लेखकाला अनुभवायला मिळते. कुत्रा चावल्यावर लेखकाच्या मनाची आणि जीवाची उडालेली तारांबळ, डॉक्टरांपासून शेजारी, ऑफिसातले सहकारी, नातेवाईक, मित्र यांचे अनाहूत सल्ले, तो इंजेक्शनचा कोर्स, चावलेला कुत्रा जिवंत आहे की मेला आहे हे पाहण्यासाठी करावी लागणारी टेहळणी, नाना तऱहेच्या नाना लोकांना द्यावी लागणारी उत्तरं, मृत्यूचं सावट… या जंजाळातून पुणे म्हणजे मोकाट कुत्र्यांचं अभयारण्य असल्याच्या निष्कर्षाप्रत लेखकाच्या भावना त्याला अशा मोकाट कुत्र्यांच्या समस्येचा अभ्यास आणि निरीक्षण करायला कसं भाग पाडतात, हे सारंच वाचण्यासारखं आहे. पुणेकरांच्या लकबी आणि त्यांच्या स्वभावविशेषांचं दर्शन घडतंच. आता खुद्द पुणेकर झालेला लेखक कुत्र्यांनी केलेली कुत्तरओज्या मिश्किल वृत्तीने सांगतो त्यातून वाचकांना एक ‘कुत्रायन’ अनुभवल्याचं समाधान नक्कीच मिळू शकतं.
मृत्यो, नको येऊ की!
लेखक ः विश्वास वसेकर
प्रकाशक ः संस्कृती प्रकाशन, पुणे
ह पृष्ठे ः 103, मूल्य ः 150 रुपये