परीक्षण- वाचनीय आणि श्रवणीय ‘ई-बुक्स’

>> श्रीकांत आंब्रे

अनंत पावसकर हे संगीत क्षेत्रातील जाणकार आणि आस्वादक म्हणून ओळखलं जाणारं रसिक व्यक्तिमत्त्व. एकेका हिंदी, मराठी लोकप्रिय गीताचा सर्वांगीण आस्वाद घेत रसग्रहण करणारा त्यांचा वृत्तपत्रातील सहा वर्षे सलग चाललेला साप्ताहिक स्तंभ वाचकांच्या पसंतीस उतरला तसेच त्यांचे ‘आठवणीतील गाणी’ हे निवडक मराठी-हिंदी भावमधुर गाण्यांचं सौंदर्य उलगडून दाखवणारं पुस्तकही त्याच्या वेगळेपणामुळे लक्ष वेधून घेणारं ठरलं. त्याच पुस्तकाच्या ई-बुकने ते फक्त वाचायचं नसतं तर ऐकायचंही असतं हे पहिल्यांदा दाखवून दिलं. या संगीतभऱया मेजवानीचा आनंद घेण्यासाठी पुस्तकाची लिंक कमेंटमध्ये होतीच. गाण्यावर क्लिक केलं की ते गाणंही ऐकू यायचं. टेक्निकल आणि म्युझिकल यांचा असा अनोखा संगम विरळाच. संगीत विश्वात आपल्या अनमोल कामगिरीचा ठसा उमटवणाऱया अनेक गायक, संगीतकार, गीतकार यांच्या प्रत्यक्ष मुलाखतींवर आधारित गीतांचा रसास्वाद घेणारी त्यांची अनेक ई-बुक्स प्रकाशित झाली आहेत.

मेलडी संगीत काळाचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ संगीतकार ‘ओ. पी. नय्यर – द किंग आाफ मेलडी’ हे त्यांचं दहावं ई-बुक तसेच अनेक संगीतकारांचे गुरू, उत्तम शास्त्राrय संगीत गायक, नाटय़संगीताचे प्रयोगशील संगीतकार आणि मैफल गाजवणारे कलावंत पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं ‘एक ऋषितुल्य गुरू – पं. जितेंद्र अभिषेकी’ हे अलीकडे प्रकाशित झालेलं ई-बुकही वैशिष्टय़पूर्ण. प. अभिषेकींच्या रागदारी गायनाचे आणि नाटय़संगीताचे असंख्य चाहते आहेत. तसेच त्यांची नामांकित शिष्यांची परंपराही मोठी आहे. या ई-बुकमध्ये त्यांच्या गायकीचे विविध पैलू त्यांनी उलगडून दाखवले आहेत.

भारतीय तबलावादन क्षेत्रातील एक उत्तुंग शिखर असलेले पं. उस्ताद अल्लारखाँ यांच्या व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्वाचा वेध दीर्घ मुलाखतीतून घेणारं त्यांचं ‘वाह उस्ताद – अल्लारखाँ’ हे ई-बुकही ‘पं. अल्लारखाँच्या तबलावादनाच्या आठवणी जागं करणारं. अत्यंत नाटय़पूर्ण आयुष्य जगलेल्या पं. उस्ताद अल्लारखाँ यांच्या घरी त्यांचे पुत्र झाकीर, तौफिक, फाझल यांच्यासह घेतलेल्या खाँसाहेबांच्या मुलाखतीचा समावेश या ‘ई-बुक’मध्ये आहे. त्यांच्याविषयी असलेल्या माहितीच्या सर्व लिंक्स आणि संदर्भ दिलेले असल्यामुळे हे ई-बुक म्हणजे आठवणींचा ऐवज आहे.
भारतीय संगीताला श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत देशाच्या कानाकोपऱयात पोहोचविण्याचे काम रेडिओनं केलं. अशा या रेडिओच्या महान कामगिरीचं गुणगान करणारं आणि गेल्या अनेक दशकांतील रेडिओच्या कामगिरीला उजाळा देणारं ‘आठवणी रेडिओ’च्या हे पावसकरांचं ई-बुकही वाचनीय आणि श्रवणीय आहे. ते विनामूल्य असून विनाअट डाऊनलोड करता येतं. त्यांची लिंकही कमेंटमध्ये आहे.

जुन्या-नव्या हिंदी चित्रपटगीतांची आणि मराठी भावगीतांची आवड असलेले अनंत पावसकर यांचं आणि संगीतविश्वाचं नातं संगीत हा त्यांचा छंद आणि व्यवसाय असल्यामुळे अधिक दृढ झालं. व्हिनस रेकार्डिंग कंपनीत संगीताची तांत्रिक बाजू ते सांभाळत. सर्व वाद्य आणि वाद्यमेळ, स्टुडिओत येणारे नामांकित गायक, वादक, संगीतकार, गीतकार यांच्याशी वारंवार येणाऱया संबंधांमुळे व घनिष्ठ परिचयामुळे त्यांची ओळख ई-बुक या माध्यमातून देणं हा उपक्रम त्यांनी यशस्वी केला. आज त्यांची चौदा ई-बुक्स उपलब्ध आहेत. मराठी रसिकांची संगीताविषयी असलेली समज, आवड आणि ज्ञान वृद्धिंगत करण्याचं काम ही ई-बुक्स निश्चित करतील