परीक्षण – रा. स्व. संघाच्या विचारधारेचा सार्थ मागोवा

>>> श्रीकांत आंब्रे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आजही बरेच जण पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहतात. त्यात संघ म्हणजे ब्राह्मणी वर्चस्व असलेली संस्था, केवळ सांप्रदायिक, संकुचित विचारसरणीची संघटना, संघ स्त्रीविरोधी असून त्यात स्त्रियांना स्थान नाही, इहवाद, विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद ही आधुनिक जीवनमूल्ये संघ नाकारतो, संघ हा मुसलमान आणि ख्रिश्चनविरोधी असून हिंसकही आहे, संघ हा विषमतावादी, मनुस्मृती प्रमाण मानणारा व अस्पृश्यतेचे समर्थन करणारा आहे, संघाची `हिंदू’ संकल्पना संकुचित असून हजारो वर्षांच्या हिंदू परंपरेला छेद देणारी आहे, संघाचा कारभार एकानुवर्ती हुकूमशाही पद्धतीने चालतो… यांसारखे अनेक आक्षेप संघावर घेतले जातात. 1925 साली स्थापन झालेला संघ आज शंभराव्या वर्षात पदार्पण करीत असताना संघ म्हणजे नेमके काय आहे, संघाचे भारतभर असलेले हजारो स्वयंसेवक सत्तेची, पैशाची, सुखासीन जीवनाची अपेक्षा न करता संघकार्याला का वाहून घेत आहेत, त्यांना संघ सोडावा असे का वाटत नाही, यासारख्या अनेकांना पडणाऱया प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न संघाचे जुने-जाणते ज्येष्ठ स्वयंसेवक व संघ हेच जीवन सर्वस्व मानून संघाची शिकवण प्रत्यक्ष जीवनात अनुसरणारे पद्मश्री रमेश पतंगे यांनी `आम्ही संघात का आहोत’ या त्यांच्या पुस्तकात केला आहे.

बालवयात संघ शाखांमध्ये विद्यार्थ्यांवर भारतमातेवर प्रेम करण्याचे, त्यांच्यात राष्ट्रभक्तीचे बीज पेरण्याचे केले जाणारे संस्कार हा आदर्श व देशभक्त संघ स्वयंसेवक बनवण्याचा पाया असतो, असे सांगताना त्यातून सुजाण नागरिक तयार होतो, जो कशाचीही हाव न धरता निरपेक्ष वृत्तीने संघकार्याला वाहून घेतो हे ते स्पष्ट करतात. हिंदूपणा आणि धर्म याची गल्लत न करता त्याच्या पलीकडे असलेली संघाची ओळख करून देताना संघाला अभिप्रेत असलेल्या हिंदूपणाची संकल्पनाही ते विस्ताराने सांगतात. ही शाश्वत संकल्पना वेदकाळापासून अस्तित्वात होती, तिचे मूळ आपल्या वेद, स्मृती, उपनिषदे, पुराणे, धर्मग्रंथ यात आहे व आपल्या धर्माचे, संस्कृतीचे, समाजाचे रक्षण करणे हे संघाचे ध्येय असून संघ जातिभेद, उच्च-नीचपणा न मानता संपूर्ण हिंदू समाजाचा एकत्वाने विचार करणारा आहे, हे ते संघ संस्थापक डा. हेडगेवार यांचा हवाला देऊन सांगतात.

जीवन जगण्यासाठी भारतमाता आपल्या उदरातून आपणास सर्वकाही देते. म्हणूनच शेतकरी तिला काळी आई म्हणतो. भूमी ही माता असल्याची भावना वेदकाळापासून आहे. सभोवतालच्या निसर्गाशी असलेल्या तिच्या नात्यामुळे सृष्टीतील विविध विभ्रमांची स्पंदने माणसाच्या मनावर उमटत असतात. म्हणूनच या मातेला तिच्याविषयी कृतज्ञ भाव बाळगून तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी निसर्गाची जोपासना करणे हे संघ आपले कर्तव्य समजतो. भारतमाता हा संघाचा शोध नसून ती पूर्वापार प्रचलित असलेल्या भारतमातेच्या गौरवाची परंपरा आहे, असेही ते सांगतात.

बुद्धिवाद्यांची परंपरा भारतात पूर्वापार असून संत ज्ञानेश्वर तिचे प्रणेते आहेत. ब्राह्मणशाहीला, रूढी प्रामाण्यवादाला आव्हान देत त्यांनी भगवद्गीतेला लोकभाषेत आणण्याचे ाढांतिकार्य केले. सर्व प्र्राणिमात्रांत एकच ईश्वर असून जातिभेदाला इथे स्थान नाही असे प्रतिपादन केले. अठरापगड जातीतल्या संतांना भागवत धर्माच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची प्रेरणा दिली. आध्यात्मिक लोकशाही, निर्माण करण्याची प्रेरणा देणारे संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले बुद्धिवादी बंडखोर होते. हीच परंपरा पुढे महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात टिळक, आगरकर, महात्मा फुले, लोकहितवादी, विठ्ठल रामजी शिंदे, स्वातंत्र्यवीर सावरकर, डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेल्याचे प्रतिपादन करून स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, स्वा. सावरकर यांच्या जीवनमूल्यांचा उगम हिंदू तत्त्वज्ञानात आहे असे संघ मानतो, हे अधिक स्पष्ट करताना भगवान महावीर, गौतम बुद्ध, गुरुनानक या तिन्ही महापुरुषांच्या मानवतावादी विचारांचा अंगिकार संघ स्वयंसेवकांच्या आचरणातून कसा होतो हे सांगत स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या संविधानाने दिलेल्या तीन मूल्यांची जपणूक संघ स्वयंसेवक करतात हे ते स्पष्ट करतात.

संघ ही एक जीवनपद्धती, जगण्याची कला आहे. ते पुस्तकी ज्ञान नाही किंवा हिंदू धर्माचे अवडंबर माजविण्याचे स्थान नाही. राष्ट्र उभारणीच्या कार्याचे आपणही एक पाईक आहोत ही जीवनसाफल्याची जाणीव त्यात आहे; आम्ही संघात का आहोत या जाणिवेचे उत्तर त्यात सामावलेले आहे, हा विचार मांडून रमेश पतंगे यांनी संघाच्या आणि काही संघ स्वयंसेवकांच्या अनन्यसाधारण त्यागाची आणि कार्याची महतीही सांगितली आहे. डा. हेडगेवारांपासून आजचे सरसंघचालक मोहन भागवतांपर्यंत ज्यांनी संघाचे नेतृत्व केले त्यांनी संघाच्या विचारांची जपणूक कशी केली यावरही प्रकाश टाकला आहे. अटलजी आणि संघातून देशाच्या सत्तास्थानी पोहोचलेल्या काही सहिष्णू संघ स्वयंसेवकांचा गुणगौरवही त्यांनी केला आहे. आजही संघात असलेले-नसलेले केंद्रातील व राज्यातील काही वरिष्ठ नेते जर संघाला अभिप्रेत असलेली मूल्ये पायदळी तुडवत असतील तर त्यांचे कान टोचण्याचे काम सरसंघचालक मोहन भागवत करीतच असतात. हे देशाने अनुभवले आहे. या पुस्तकातील त्यांची प्रस्तावना हा संघाची विचारधारा ठळकपणे सांगणारा महत्त्वाचा ठेवा आहे. या पुस्तकामुळे संघ कार्याला वाहून घेणाऱ्या हजारो स्वयंसेवकांना आपल्या सेवाकार्याचे चीज होत असल्याचे आंतरिक समाधान नक्कीच मिळेल. राहुल मुरलीधर वाकडे यांचे सुंदर मुखपृष्ठ, रवींद्र वेंगुर्लेकर यांची समर्पक रेखाचित्रे, सुरेख मांडणी यामुळे पुस्तकाचे देखणे स्वरूप नजरेत भरणारे आहे.

आम्ही संघात का आहोत…
लेखक ः रमेश पतंगे
प्रकाशक ः विवेक प्रकाशन
पृष्ठे ः 175 मूल्य ः 250 रुपये