परीक्षण – झंझावाती व्यक्तिमत्त्वाची प्रचीती

>> श्रीकांत आंब्रे

कृष्णाकाठच्या मातीत बालपण गेलेल्या, सांगली-कोल्हापूरच्या संस्कृतीत जडणघडण झालेल्या आणि मुंबईत प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक म्हणून नाव कमावलेल्या मोहन देशमुख यांचं ‘कृष्णाकाठावरून-सांगली ते मुंबई’ हे प्रेरणादायी आणि साध्या, सोप्या प्रवाही भाषेत खिळवून ठेवणारं आत्मकथन. गरीब परिस्थितीतही बी.ए.पर्यंत शिक्षण घेऊन नोकरी नव्हे, तर मुंबईत व्यवसायातच जम बसवीन असे पोलीस असलेल्या वडिलांना आत्मविश्वासाने सांगून मुंबईची वाट धरणाऱया या तरुणाने केवळ प्रामाणिक आणि आदर्श बांधकाम व्यावसायिक म्हणूनच नाव कमावलं नाही तर अपार कष्टातून नवनवी आव्हानं पेलत जणू शून्यातून विश्व निर्माण करत इतरही अनेक क्षेत्रांत आपला ठसा कसा उमटवला याचं थक्क करणारं दर्शन या आत्मकथनात घडवलं आहे.

शिक्षकी पेशापासून बांधकाम व्यावसायिक म्हणून मुंबईने त्यांना अनेक संधी दिल्या. बांधकाम व्यवसायाने पैसा, नाव, प्रतिष्ठा दिली तसंच अनेक सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक संस्थांशी जोडण्याची, वेगवेगळ्या क्षेत्रांतील व थरांतील अनेक नामवंत व्यक्तींना भेटण्याची, त्यांच्याशी मैत्री जोपासण्याची आणि स्वतःला घडवण्याची संधीही दिली. जीवनातील आनंदात गेलेला प्रत्येक दिवस व क्षण याचा आनंद केवळ आपल्यापुरताच मर्यादित न ठेवता तो सर्वांनाच वाटावा या भावनेतून हा लेखनप्रपंच केल्याची त्यांची भावना आहे. हा त्यांचा कृतज्ञता भाव मनापासून असला तरी त्यासाठी त्यांनी बांधकाम तसेच इतर व्यवसायांतही पायाला भिंगरी लागल्यागत कशी आणि किती वेगाने मुशाफिरी केली हे वाचून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

सुरुवातीला तुटपुंज्या भांडवलावर शेतीसाठी लागणारी अवजारं आणि ट्रक्टरसाठी लागणारी स्पेअर पार्ट यांची विक्री करण्याचा व्यवसाय करता करता बांधकाम क्षेत्रातल्या मित्राच्या मदतीने त्यांनी बांधकाम व्यवसायात किती आपसूक पदार्पण केलं हे कदाचित त्यांनाही समजलं नसेल. त्या व्यवसायाचे बारकावे जाणून घेतल्यामुळे त्यांच्या बांधकाम व्यवसायाचा पाया भक्कम होत गेला. मध्यमवर्गीयांना परवडतील असे अनेक गृहप्रकल्प त्यांनी साकार केले. देशमुख बिल्डर प्रा. लिमिटेड या स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून चाळीस वर्षं बांधकाम व्यवसाय करताना मुंबई उपनगर आणि ठाणे, कल्याण, विरार, बोरिवली इत्यादी अनेक भागांत त्यांनी मोठय़ा प्रमाणावर आदर्श गृहप्रकल्पांची निर्मिती केली. या क्षेत्रात काम करताना त्यांना अनेक कटू प्रसंगांना तोंड द्यावं लागलं.

देशमुख कधीही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. विपश्यना ही माझी जीवनवाहिनी आहे असं मानणाऱया देशमुखांना बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी झालेल्या एका भेटीनंतर पाटण्याला विपश्यना केंद्र बांधण्यासाठी जागा मंजूर करून त्यासाठी चार कोटींचा निधीही दिला. या व्यवहारामुळे त्यांना सर्वच क्षेत्रांत मित्र मिळत गेले.

सांगलीतील माजी मुख्यमंत्री वसंतदादांसह अनेक नामवंत राजकीय नेते, कलावंत, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, डॉक्टर, वकील त्यांच्या भावविश्वात कसे आले व त्यांच्याशी मैत्रीचे बंध कसे घट्ट होत गेले याचं हृद्य वर्णन ते करतात. कलासक्त मनामुळे त्यांनी साहित्याची आवड जोपासली. नाटक, सिनेमा, साहित्य, संगीत, राजकारण, समाजकारण इत्यादी विविध क्षेत्रांतील नामांकितांच्या कितीतरी मैफली पार्ल्यातील आपल्या देखण्या बंगल्यात सजवल्या. व्यवसाय विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर कुठे थांबायचे याचा योग्य निर्णयही त्यांनी घेतला. उर्वरित आयुष्यात करावयाच्या कामाचं नियोजनही केलं. त्यांच्या विविधरंगी जीवनाचा हा कॅलिडियोस्कोप पाहताना एका वैविध्यपूर्ण झंझावाती व्यक्तिमत्त्वाची प्रचीती येते.

कृष्णाकाठावरून सांगली ते मुंबई
लेखक ः मोहन देशमुख
प्रकाशक ः ग्रंथाली
मूल्य ः 300 रुपये
पृष्ठे ः 159