महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. आकाशी पाळण्याबरोबरच विविध करमणुकीच्या साधनांबरोबरच हजारो व्यावसायिक यात्रेत दाखल झाले आहेत. खिलार जातीची जनावरे यात्रेचे प्रमुख आकर्षण बनले असून, मोठ्या संख्येने जनावरे दाखल होत आहेत
जतनगरीची ग्रामदेवता, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामीळनाडू, गोवा आदी राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून, ही यात्रा सोमवार दि. ३० डिसेंबर अखेरपर्यंत भरणार आहे. गुरुवारपासून (दि. २६) श्री यल्लम्मा देवीचे भक्त यात्रास्थळावर येऊन श्री यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन तसेच देवीचा नवस फेडत आहेत.
आज गुरुवार देवीच्या गंधोटगीचा दिवस आहे. शुक्रवार, २७ रोजी देवीला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात येणार असून, शनिवार २८ रोजी देवीच्या पालखीची नगरप्रदक्षिणा व किचाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर देवीचा दरवाजा दर्शनासाठी बंद राहणार असून, तो सोमवारी अमावास्येला उघडला जाणार आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फतच या जनावरांच्या बाजाराचे नियोजन केले आहे. बाजार समितीच्या वतीने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. तसेच यात्रास्थळावर कृषिप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले आहे.
श्रीमंत डफळे राजघराण्याचे श्री यल्लम्मा देवी हे खासगी देवस्थान आहे. जतच्या श्रीमंत डफळेंनी देवीवर असलेल्या श्रद्धेपोटी सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवीला प्रसन्न करून जतला घेऊन आल्याची आख्यायिका आहे. पूर्वीच्या काळी ही यात्रा जत संस्थानिक भरवीत होते. त्यांनी यात्रेकरिता मार्गशीर्ष या महिन्याची निवड केली. नंतर ही यात्रा तत्कालीन जत ग्रामपंचायत भरवीत होते. सध्या ही यात्रा श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान, जत यांच्यामार्फत भरविली जात आहे
अवैध व्यावसायिकांमुळे भाविकांमध्ये नाराजी
गतवर्षी यल्लम्मा यात्रेत अवैध व्यासायिकांनी धुडगूस घातला होता. या वर्षीही पोलिसांच्या दुर्लक्षेमुळे तीनपानी जुगार, मटका यांसारखे अवैध व्यवसाय खुलेआमपणे सुरू आहेत. हुबळी मेड, गोवा बनावटीची दारू, गावठी, शिंदी विक्री जोमात सुरू आहे. त्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. परिणामी, भाविकांना नाहक त्रास होत आहे. या गैरसोयीबद्दल भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनी याबाबत कारवाईच्या सूचना देण्याची मागणी होत आहे.
अतिक्रमणांमुळे जनावरांचा बाजार अडचणीत
खिलार जनावरांसाठी ही यात्रा प्रसिद्ध असून, मोठ्या प्रमाणात या यात्रेत खिलार जनावरे दाखल झाली आहेत. मात्र, ज्या जागेवर जनावरांचा बाजार भरविण्यात आला आहे. त्याठिकाणी स्थानिकांनी अतिक्रमणे करून प्लॉटिंग केल्याने जनावरांचा बाजार भरविण्यात अडचणी येत आहेत.