नवजात बालिकांसाठी आता श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना, 10 हजार रुपये फिक्स डिपॉझिट जमा होणार

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे राज्यात लवकरच ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 8 मार्च रोजी म्हणजेच ‘जागतिक महिला दिनी’ शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालिकांच्या नावाने 10 हजार रुपये फिक्स डिपॉझिट तिच्या मातेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. लवकरच याबाबतचा प्रस्ताव ट्रस्टकडून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न व्हावेत या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या धर्तीवर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ सुरू करण्यात येणार आहे. न्यास व्यवस्थापन समितीकडून अशा स्वरूपाची योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. शासनाच्या मान्यतेनंतर या योजनेसाठीचे निकष जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.

ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न 133 कोटी रुपये 

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास विश्वस्त समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र तसेच सन 2025-26 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले. न्यासाचे 2024-25 चे वार्षिक उत्पन्न 133 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले असून गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात 15 टक्के वाढ झाली आहे. आशिर्वचन पूजा देणगी, लाडू व नारळवडी यासंदर्भातील नियोजनामुळे उत्पन्नात वाढ झाल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे.