दक्षिण हिन्दुस्थानातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव येथील यात्रेला आज देवस्वारीने प्रारंभ झाला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणत बेलभंडार्याची उधळण करीत पारंपारीक पद्धतीने यात्रा सुरू झाली. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानकर्यांच्या पालखीचे शासकीय विश्रामगृहावर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मानाचा फेटा, शाल, श्रीफळ व मानधन देवून स्वागत करण्यात आले.
देवस्थान कमिटीच्या वतीने पूजा करुन दुपारी पालखी पुजनानंतर देव स्वारी काढण्यात आली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, लोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी, हंसराज पाटील बोरगावकर, संजय कर्हाळे, राष्ट्रवादीचे मनोहर भोसीकर, माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य साहेबराव काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे आदी उपस्थिती होते.
खंडोबा यात्रेत वाघ्या-मुरळी
उत्तम जागा पाहुनी मल्हारी देव नांदे गड जेजुरी उत्तराची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी असा घोष करत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करतात. पारंपारीक पद्धतीने कवड्याच्या माळी, लांब हळदीचा मळवट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करतात. या वाघ्या मुरळीला पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.