‘चांगभलं’च्या गजरात श्री जोतिबाची खेटे यात्रा सुरू

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीने अनवाणी चालत येऊन, दख्खनचा राजा श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. ही परंपरा जोपासणाऱ्या कोल्हापूरकरांनी यंदाही रविवारपासून (दि. 16) अनवाणी पायी चालत, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात खेटे घालण्यास सुरुवात केली.

कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविकही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत. आज खेटे यात्रेच्या पहिल्या दिवशी श्री जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती.

आज रविवारी पहिला खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे गायमुखमार्गे वाडी, रत्नागिरी डोंगरावर जोतिबा मंदिरात पहाटेपासून भाविक चालत आले. जोतिबाचा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. यावेळी भाविकांनी केलेल्या ‘जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर डोंगरावर घुमत होता. मध्यरात्रीपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

रविवारी पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. सकाळी 8 ते 9 अभिषेक, सकाळी 11 वाजता धुपारती, दुपारी 3 ते 4 अभिषेक आणि रात्री पालखी सोहळा संपन्न झाला. स्थानिक पुजारी, ग्रामपंचायत आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून डोंगरावर येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. महाराष्ट्र, कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
(छाया: दत्ता धडेल)