मुंबई रणजी संघासाठी वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) स्टेडियमवर खेळल्या जाणाऱया सामन्यात मुंबईला पुन्हा एकदा विजयी ट्रकवर आणण्यासाठी श्रेयस अय्यर संघात परतला आहे. त्रिपुराविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रेयस खेळला नव्हता. तो संघात परतला असला तरी पृथ्वी शॉला मात्र संघाबाहेर काढण्यात आले आहे.
मुंबईसाठी बीकेसीची खेळपट्टी नेहमीच फायदेशीर आणि भाग्यशाली ठरत आलीय. यंदाच्या मोसमात मुंबईने तीन सामन्यांपैकी मिळवलेला एकमेव विजय याच मैदानावर मिळवला आहे. त्यामुळे ओडिशाविरुद्धही मुंबई निर्णायक विजय मिळवेल, असा विश्वास मुंबईकडून व्यक्त केला गेला आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकात्याने आयपीएल जेतेपद संपादले होते. असे असतानाही श्रेयसला कोलकात्याने रिलीज केले आहे. हा निर्णय सर्वांसाठी धक्कादायक आहे. आयपीएलच्या इतिहासात जेतेपदाच्या कर्णधाराला मुक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोलकात्याकडून मिळालेल्या धक्क्यानंतर लिलावातही त्याच्यासाठी काहीतरी खळबळजनक गोष्ट असेल, असेही सूत्रांकडून बोलले जात आहे.
पृथ्वीसाठी पुनरागमन कठीण
प्रचंड गुणवत्ता असूनही आपल्या निराशाजनक कामगिरीमुळे हिंदुस्थानी संघाबाहेर फेकला गेलेला पृथ्वी शॉ आपल्या गैरवर्तनामुळे मुंबईच्या संघाबाहेरही फेकला गेला आहे. गेल्या सामन्यातही त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. मात्र आता त्याची 16 सदस्यीय संघातही निवड न केल्यामुळे त्याला संघात पुनरागमन करणे कठीण जाणार आहे.
मुंबई संघ ः अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अधटराव, शम्स मुलानी, हर्ष कोठारी, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, जुनेद खान, रॉयस्टन डायस.