माझे शतक विसर, मोठे फटके मार, श्रेयसने प्रोत्साहन दिल्याचे शशांकचा खुलासा

हिंदुस्थानचे फलंदाज हे शतकासाठी नाहीतर संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळतात हे पुन्हा एकदा श्रेयस अय्यरने सिद्ध करून दाखवले. गुजरातविरुद्धच्या सामन्यात 97 धावांवर नाबाद असतानादेखील ‘माझ्या शतकाचा विचार करून नकोस, मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मोठे फटके मार,’ अशा शब्दांत श्रेयसनेच मला प्रोत्साहित केल्याचा खुलासा शशांक सिंगने केला.

मंगळवारी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना अत्यंत अटीतटीचा झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या फलंदाजांनी 5 विकेटच्या मोबदल्यात 243 धावांचा डोंगर उभा केला. याच्या प्रत्युत्तरात गुजरातने 232 धावा केल्याने पंजाबने अवघ्या 11 धावांनी विजय मिळवला.

मात्र पंजाबच्या फलंदाजीच्या वेळी एक नाट्य पाहायला मिळाले. शेवटच्या षटकात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर हा 97 धावांवर नाबाद खेळत होता, मात्र शशांकने श्रेयसला स्ट्राईक देण्याऐवजी सर्व चेंडू एकट्याने खेळल्याने शशांकवर सर्व स्तरातून टीका होत होती.

मात्र सामना संपल्यानंतर शेवटच्या षटकात श्रेयस आणि शशांक यांच्या झालेल्या संभाषणाबाबत शशांकने खुलासा केला आहे. शशांकने सांगितले, गुजरातची फलंदाजी मजबूत असून ते कोणताही सामना उलटू शकतात. त्यामुळे त्यांच्यविरुद्ध जास्तीत जास्त धावसंख्या उभी करणे गरजेचे आहे. त्यामुळे तू माझ्या शतकाचा विचार न करता मोठे फटके मार, असे श्रेयसनेच सुचवले. मी पुढच्या सामन्यातही शतक करू शकतो, असेही श्रेयस म्हणाला.

श्रेयस म्हणाला, आमच्यात झालेली चर्चा मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्देशाने होती. आम्हाला माहीत होते की, गुजरात टायटन्सकडे एक मजबूत फलंदाजी आहे. त्यामुळेच मी त्याला फक्त मोठे फटके मारायला सांगितले. श्रेयसने गेल्या आयपीएल हंगामात शशांकच्या फलंदाजीचे कौतुक केले आणि ते त्याच्यासाठी खूप प्रेरणादायी म्हटले आणि शशांकने केलेल्या 44 धावांचे महत्त्व स्पष्ट केले.

अय्यरने सामना जिंकणारी खेळी केली आणि फक्त 42 चेंडूंत 97 धावा करत नाबाद राहिला. शशांक सिंगनेही त्याच्या डावाच्या सुरुवातीपासूनच फक्त 16 चेंडूंत 44 धावांची प्रभावी खेळी केली. श्रेयस आणि शशांक या जोडीने शेवटच्या चार षटकांत 77 धावा काढून गुजरातला घरच्या मैदानावर धक्का दिला.