‘त्या’ बोगद्यात काम करणाऱ्या कामगारांचा नोकरीला रामराम

नागरकुरनूल येथील निर्माणाधीन श्रीलैलम लेफ्ट बँक कॅनाल बोगद्याचा एक भाग 22 फेब्रुवारी रोजी कोसळला. तेव्हापासून त्यात 8 कामगार अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य जिवाची बाजी लावून काम करत आहे, परंतु या कामगारांची वाचण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणारे उरलेले कामगार नोकरीला रामराम ठोकत असल्याचे चित्र आहे.

बचाव पथकांनी आता टनेल बोरिंग मशीनचे काही भाग आणि अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतर अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. नागरकुरनूलचे पोलीस अधीक्षक वैभव गायकवाड म्हणाले की, बोगद्याच्या आत चिखल असून सुमारे 300 मीटर अंतरावर कचरा पसरलेला आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान या प्रकल्पात सुमारे 800 कामगार काम करत असून यापैकी 300 कामगार स्थानिक आहेत आणि उर्वरित झारखंड, ओडिशा व उत्तर प्रदेशातील आहेत.