वाकोल्यामध्ये साकारले अयोध्येतील राम मंदिर; श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा भव्यदिव्य देखावा

उंचच उंच गणेशमूर्ती आणि भव्यदिव्य देखावे हे मुंबईतील गणेशोत्सवाचे वैशिष्टय़. सांताक्रुझ पूर्व वाकोला येथील यशवंत नगर येथे यंदा अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मंदिराचा कळस, रंगरंगोटी आणि आकर्षक रोषणाई यामुळे प्रत्यक्षात राम मंदिरात आल्याचा अनुभव गणेशभक्तांना मिळेल. विशेष म्हणजे, मंदिरात विराजमान करण्यात आलेली बाप्पाची मूर्तीही प्रभू श्रीरामाच्या अवतारात आहे. हा देखावा बघण्यासाठी मुंबईकरांच्या रांगा लागत आहेत.

हिंदू संस्कृतीची परंपरा आणि कला जपणाऱ्या सांताक्रुझच्या यशवंत नगर (शिवसेना शाखा क्रमांक 91) मधील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 40 वे वर्ष आहे. गेल्या 39 वर्षांपासून मंडळ विविध प्रकारच्या हुबेहूब प्रतिकृती साकारून सामाजिक व सांस्कृतिक संदेश देण्याचे काम करतेय. मंडळाचे सर्वेसर्वा, कार्याध्यक्ष व कलिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून यंदा अयोध्येतील राम मंदिराची भव्य अशी प्रतिकृती साकारली आहे.

खांबांवरील सुबक कोरीव आणि नक्षीकाम डोळय़ात चटकन भरेल असेच आहे. जोडीला आकर्षक रोषणाईही असून मंदिरात आल्यानंतर मनाला मिळणारी शांतता, अध्यात्म भाव आणि प्रसन्नता गणेशभक्तांना अनुभवता येणार आहे. आमदार संजय पोतनीस यांच्या मार्गदर्शनाने श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवते, त्याप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांसाठी तसेच महिलांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचेसुद्धा आयोजन करण्यात आले आहे.