>> योगेश जोशी
सणांचा आणि उत्सवांचा असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात नवविवाहित महिलांना उत्सुकता असते ती म्हणजे मंगळागौरी व्रताची…तसेच तुझे कितवे मंगळागौरी व्रत अशी विचारणाही महिला एकमेकींना करतात. पण मंगळागौरी व्रत म्हणजे नेमके काय, ते कशासाठी आणि का करतात, असे प्रश्न पडतात. तर जाणून घेऊया श्रावणी मंगळवारी करण्यात येणाऱ्या मंगळागौरी व्रताबाबतची माहिती.
नावावरून गौरी म्हणजे पार्वती, हिमालयकन्या..महादेव हेच पती म्हणून मिळावे यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली. देवी पार्वतीच्या नावावरून या व्रताला मंगळागौरी असे नाव पडले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहीत महिला लग्नानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत करतात. पतीपत्नी मधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशिर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी असावी यासाठी हे व्रत करण्यात येते.
नवविवाहित महिला त्यांच्यासारख्या नवविवाहितांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. या प्रमाणे भक्तीभावासह मनोरंजन आणि बोध अशा दोन्ही गोष्टी या व्रताद्वारे साधल्या जातात. सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते. त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती मांडण्यात येते. त्याच्या शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. पूजा करताना 16 प्रकारच्या पत्री देवीला अर्पण केल्या जातात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते.
दिवसा मंगळागौरीची पूजा झाल्यावर रात्री जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याची रीत आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात – लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं आदी गाणे म्हणण्यात येतात. वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा – इत्यादी. असे साधारणतः 110 प्रकारचे खेळ यात खेळले जातात.यात सुमारे 21 प्रकारच्या फुगड्या असतात.
पुर्वीच्या काळी जात्यावर दळण दळण्यापासून ते रात्री स्वंयपाकघर स्वच्छ करण्यापर्यंत अनेक कष्ठाची कामे महिलांना करावी लागत होती. तसेच नदी किंवा विहिरीहून पाणी आणणे, पाणवठ्यावर कपडे धुवायला जाणे, या कामांच्या धबडग्यात महिलांना मोकळा वेळ किंवा मिळतच नव्हता. त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांना थोडावेळ मिळावा. त्यांनाही मैत्रिणींना भेटता यावे, एकमेकींच्या ख्यालीखुशाली समजावी, यासाठी हे व्रत एकत्र येत साजरे करण्यात येत होते. तसेच या खेळातून मनोरंजन होत आनंदही मिळत असे. मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य देणारे, चैतन्य देणारे व सामुहिकपण आनंद साजरा करण्याचे व्रत आहे.
आता बदलत्या जीवनशैलीप्रमाणे मंगळागौरीच्या पुजेसाठी सकाळी गुरुजी येतात. तसेच रात्रीच्या जागरणासाठी, खेळासाठी महिलांचे अनेक गटही तयार करण्यात येतात. बदलत्या काळानुसार मंगळागौरी हा एक इव्हेंट झाला आहे. उत्साह देणारा तो उत्सव याप्रमाणे या इव्हेंटला विरोध होण्याचे कारण नाही. मात्र, प्रथा, परंपरा, प्रघात, रीत म्हणून सण, उत्सव, व्रत साजरे करण्याऐवजी त्यामागील कारण आणि हेतू समजून घेतले, तर आनंद द्विगुणीत होण्यासह आपल्या संस्कृतीतील उदात्त विचारांची ओळखही होणार आहे.