![shraddha walker father](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/shraddha-walker-father-696x447.jpg)
हत्या झालेल्या आपल्या मुलीच्या मारेकऱ्याला फाशी व्हावी यासाठी अहोरात्र लढा देणाऱ्या श्रद्धा वालकर हिच्या वडिलांचा संघर्ष अखेर आज कायमचा थांबला. श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचे रविवारी सकाळी वसईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. श्रद्धावर अंत्यसंस्कार करता यावेत याकरिता ते गेली तीन वर्षे तिच्या मृतदेहाचे तुकडे ताब्यात मिळावेत म्हणून प्रयत्न करत होते. परंतु या ‘दुर्दैवी’ पित्याची ही इच्छा नियतीने पूर्ण न करताच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
28 वर्षीय श्रद्धाची तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने दिल्लीत मे 2022 मध्ये हत्या करून केली होती. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. कोणालाही संशय येऊ नये म्हणून हे तुकडे गुडगाव येथील जंगलात फेकून दिले होते. 14 नोव्हेंबर 2022 रोजी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. वसईत राहणारे मृत श्रद्धाचे वडील विकास वालकर गेल्या ३ वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. रविवारी सकाळी वालकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
मनाला कायम खंत लागून होती
श्रद्धावर अंत्यसंस्कार करायचे असल्याने विकास वालकर हे मृतदेहाचे अवशेष मिळवेत म्हणून दिल्लीवारी करत होते. दरम्यान हे प्रकरण जलदगती न्यायालयात असूनही अनेक तांत्रिक गोष्टींमुळे अजूनही या प्रकरणाचा निकाल लागला नसून याची खंत त्यांना होती.