आयओए अध्यक्षांना क्रीडा संहितेची आठवण, कोषाध्यक्ष सहदेव यादव यांना कारणे दाखवा नोटीस

निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय क्रीडा संहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करताच हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांना क्रीडा संहितेची आठवण झाली आणि त्यांनी आयओए कोषाध्यक्ष सहदेव यादव यांना चक्क कारणे दाखवा नोटीस बजावली. 24 सप्टेंबरपर्यंत उत्तर द्यावे, असे आदेशही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

क्रीडा संहितेअंतर्गत वय आणि कार्यकाल मर्यादेबाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन करून यादव आणि इतर काही अधिकारी पदावर कार्यरत आहेत. क्रीडा संहितेनुसार, 12 वर्षे सतत विविध पदे भूषविल्यानंतर पद सोडावे लागते. यादव यापूर्वी वेटलिफ्टिंग फेडरेशनचे सचिव होते आणि 15 वर्षे ते या महासंघाशी संबंधित होते. दरम्यान याप्रकरणी तक्रारदाराने हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनकडे तक्रार दाखल केली.

तसेच नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष अजय पटेल, हिंदुस्थान वुशू फेडरेशनचे भूपिंदर सिंग बाजवा आणि रोइंग फेडरेशनचे अध्यक्ष राजलक्ष्मी सिंग देव यांच्यासह इतर सदस्यांनीही क्रीडा संहितेचे पालन न केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच या लोकांना आयओएच्या कार्यकारी समितीतून तत्काळ काढून टाकण्याची मागणी केली आहे. या तक्रारीनंतर पी. टी. उषा यांनी यादव यांना नोटीस पाठवली असून, याबाबत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.