लक्षवेधक – ओडिशामध्ये सापडली सोन्याची देशातील सर्वात मोठी खाण

देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण ओडिशा राज्यात सापडली. ओडिशातील अनेक जिह्यांत सोण्याच्या खाणी सापडल्या आहेत. सरकार लवकरच या सोन्याच्या खाणीचा लिलाव करणार आहे.  ओडिशामधील सुंदरगड, नबरंगपूर, अंगुल आणि कोरापूटमध्ये अशा अनेक जिह्यांमध्ये सोन्याच्या खाणी आढळल्या आहेत. सर्वेक्षणादरम्यान सोन्याचे मोठे साठे आढळेले आहेत. प्राथमिक सर्वेक्षणात मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध जिह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असल्याचे दिसून आले. खाण मंत्री बिभूती भूषण जेना यांनी ओडिशा विधानसभेत याबाबत माहिती दिली.  जशीपूर, सुरियागुडा, रुआंसी, इडेलकुचा, मरेदिही, सुलेपत आणि बदामपहार येथे नवीन सोन्याचे साठे सापडले.   केओंझार जिह्यातील गोपूर-गाझीपूर, मानकडचुआन, सालेकाना आणि दिमिरिमुंडा भागातही सोन्याचे साठे शोधले जात आहेत. मयूरभंजमधील जशीपूर, सुरियागुडा आणि बदामपहार भागात प्राथमिक सर्वेक्षण सुरू आहे.

कश्मिरी पंडितांना श्रद्धांजली, मुलांची वडिलोपार्जित घरांना भेट

जम्मूकश्मीरमधील पुलवामा जिह्यातील नदीमार्ग हत्याकांडाला रविवारी 22 वर्षे पूर्ण झाली. 23 मार्च 2003 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी 24 कश्मिरी पंडितांची निर्घृण हत्या केली होती. या हल्ल्यात 11 पुरुष, 11 महिला आणि दोन मुले मारली गेली. त्यानंतर त्यांची घरे जाळण्यात आली. नदीमर्ग गावात आज मृत काश्मिरी पंडितांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कश्मिरी पंडितांची जिथे हत्या झाली तिथे हवन आणि प्रार्थना करण्यात आली. यावेळी ‘त्या’ काळ्या रात्रीच्या आठवणीने सारे भावुक झाले. लहान मुलांनी नदीमार्ग गावात त्यांच्या वडिलोपार्जित घरांना भेट दिली. मूळ निवासींना अश्रू अनावर झाले. एका स्थानिकाने सांगितले की, मी तेव्हा 13-14 वर्षांचा असेल. काश्मिरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया सुरू झाल्या. आमचे कुटुंब इथून गाव सोडून गेले. काही कुटुंब 2023 पर्यंत राहिले. त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.  इथल्या घरांवर आजही गोळ्यांचे निशाण आहेत.

औरंगजेबाची भूमिका हुबेहुब साकारायची होती – अक्षय खन्ना

छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. ‘छावा’च्या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली, तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेचे खूप कौतुक होतेय. आपल्याला कुणी ओळखू नये अशी इच्छा ‘छावा’ची ऑफर स्वीकारण्याआधी अक्षय खन्नाने व्यक्त केली होती. त्याबद्दलही अक्षयचे कौतुक होत आहे. याबद्दल ‘छावा’ सिनेमाचे लेखक रिशी विरमानी  एका मुलाखतीत म्हणाले, ‘अक्षय खन्ना यांना अनेक सिनेमांमध्ये खूप वेगळ्या भूमिका साकारताना आपण पाहिलेय. त्यामुळे अक्षय खन्ना यांनी ही भूमिका साकारली तर काहीतरी वेगळा परिणाम घडेल. त्यामुळे आम्ही त्यांना भेटायचं ठरवलं. त्यांना सिनेमाची स्क्रीप्ट आवडली आणि ते ‘छावा’मध्ये काम करायला तयार झाले. ते खूप उत्सुक होते.’’  अक्षय खन्ना आम्हाला म्हणाले, ‘‘लोकांनी मला ओळखावं ही माझी इच्छा नाही. औरंगजेब हा औरंगजेबच वाटला पाहिजे.’’

देवीच्या मंदिराजवळ 150 फूट उंचीचा रथ कोसळला

कर्नाटकच्या बंगळुरूमधील आणेकल तालुक्यात हुस्कुर मड्डुरम्मा जत्रेत शनिवारी मोठी दुर्घटना घडली. जत्रा सुरू असताना 150 फूट उंच भव्य रथ कोसळला. मुसळधार पाऊस आणि वादळ यामुळे रथ कोसळला. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. दरवर्षी मार्च महिन्यात मड्डुरम्मा जत्रा भव्य मोठय़ा प्रमाणात आयोजित केली जाते. जत्रा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. या जत्रेची खास ओळख म्हणजे येथील भव्यदिव्य असा रथ असतो. गावकरी हा रथ खेचून जत्रेच्या ठिकाणी घेऊन जातात. या वर्षी डोड्डनगामंगला आणि रायसंद्रा गावातून रथ आणण्यात आला होता. हा रथ बैल, ट्रक्टर, जेसीबी मशीन आणि गावकऱ्यांच्या मदतीने खेचण्यात येत होता. रथ हुस्कुर मड्डुरम्मा मंदिराजवळ पोहोचला त्याच वेळी अचानक हवामान बदलले. मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे रथ अस्थिर झाला. रथ एकीकडे झुकला आणि तिथे जमलेल्या भाविकांवर कोसळला.

अॅटलीच्या चित्रपटासाठी अल्लू अर्जुन घेणार 175 कोटी

अभिनेता अल्लू अर्जुनने मानधनाच्या बाबतीत सर्व विक्रम मोडून बॉलिवूड अभिनेते शाहरुख-सलमानसह दिग्गजांना मागे टाकले आहे. अल्लू अर्जुनने अॅटलीच्या चित्रपटासाठी तब्बल 175 कोटी रुपयांचा करार केल्याचे समजते. ‘पुष्पा 2’ चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा अल्लू अर्जुन सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. तरुण दिग्दर्शक अॅटली चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अल्लू अर्जुनने चित्रपटासाठी सन पिक्चर्स प्रोडक्शन हाऊसच्या निर्मात्यांशी 175 कोटी रुपयांचा करार केला असून चित्रपटाच्या नफ्यात अभिनेत्याचा 15 टक्के वाटादेखील असेल. या करारासह अल्लू अर्जुनने मानधनाच्या बाबतीत अव्वल स्थान गाठले. अॅटलीने यापूर्वी शाहरुख खानसोबत ‘जवान’ चित्रपट बनवला होता. त्यानेदेखील चांगला गल्ला कमावला होता. अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025 दरम्यान होईल. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरले नसून ए6 असे प्राथमिक नाव देण्यात आले आहे.