आर्थिक वर्ष 2023-24 साठी इन्कम टॅक्स फाईल करणाऱ्यांपैकी जवळपास 12 लाख लोक रिफंडच्या प्रतीक्षेत आहेत. देशातील 12 लाख लोकांना अद्याप रिफंड मिळाला नाही, अशी माहिती अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी दिली. देशात एपूण 3.68 कोटी आयटी रिटर्नपैकी 3.56 कोटी लोकांना रिफंड मिळाल्याचे ते म्हणाले. ज्या 12 लाख लोकांना रिफंड मिळाला नाही त्यामागे बँक खाते चुकीचे, पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक नसणे आदींचा समावेश आहे. काही करदात्यांनी आयकर विभागाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळल्याने त्यांना रिफंड मिळाला नाही.
सेंट्रल बँक ऑफ इंडियात 266 जागांसाठी भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये एपूण 266 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून उद्या 9 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवार हा पदवीधारक असावा तसेच त्याने वैद्यकीय, अभियांत्रिकी, सीए केलेले असावे. उमेदवाराचे वय किमान 21 ते 32 वर्षे असायला हवे. उमेदवाराची ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिपृत वेबसाइट centralbankofindia.co.in वर दिली आहे. बँकेत नोकरी करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.
गुगलने आणले ‘आस्क फॉर मी’ फिचर
गुगलने आपल्या युजर्ससाठी पुन्हा एकदा एक नवीन फिचर आणले असून या फिचरचे नाव ‘आस्क फॉर मी’ फिचर आहे. या फिचरद्वारे युजर्सला परिसरातील जवळचे दुकान आणि सलूनची माहिती मिळणार आहे. या फिचरमध्ये एआय आधारित का@ल मिळवण्यापासून ऑप्ट आऊट करण्याचा ऑप्शन यात देण्यात आला आहे. हे सर्व एआयद्वारे युजर्सला उपलब्ध होणार आहे. हे फिचर युजर्सला किती उपयोगी पडू शकते, युजर्सचा अनुभव सुधारण्यास नक्की मदत मिळू शकेल का, हे युजर्सला लवकरच समजू शकेल.
यूएसएआयडीत 9700 कर्मचाऱ्यांना डच्चू
जागतिक मानवता मदत एजन्सी यूएसआयडीमधील 10 हजार कर्मचाऱ्यांपैकी 9700 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा धक्कादायक निर्णय ट्रम्प सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार असून या कार्यालयात आता केवळ 294 कर्मचारी शिल्लक राहणार आहेत. हे कर्मचारी केवळ आफ्रिका आणि आशिया ब्युरोमध्ये राहणार आहेत. आफ्रिका ब्युरोमध्ये 12 जण, तर आशिया ब्युरोमध्ये केवळ 8 कर्मचारी राहतील. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. यूएसएआयडीचे माजी प्रमुख जे. ब्रायन एटवूड यांनी या निर्णयावर टीका केलीय.