लक्षवेधक – ऑर्डरनंतर आयफोन 10 मिनिटांत घरी

आयफोन खरेदी केल्यानंतर दोन ते चार दिवस वाट पाहावी लागणार नाही. ऑर्डर केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत आयफोन दिलेल्या पत्त्यावर घरी पोहोचेल. स्विगी इन्स्टामार्टने ही सेवा सुरू केली आहे. ही सेवा सध्या दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, पुणे, गुडगाव, नोएडासह एकूण 10 शहरांत उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच ही सेवा अन्य शहरांत सुरू करण्याचा पंपनीचा प्रयत्न सुरू आहे. स्विगी इन्स्टामार्टवर ग्राहक आता मोठे ब्रँड्स अॅपल, सॅमसंग, वनप्लस, शाओमीचे स्मार्टफोन ऑर्डर करू शकतील. यामध्ये आयफोन 16 ई, सॅमसंग एम35, वनप्लस नॉर्ड सीई, रेडमी 14 सी यासारख्या पॉप्युलर मॉडेलचा समावेश आहे.

अमेरिकेत 6.6 कोटींचे हिरे लंपास

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे एका टिफनी ज्वेलर्सचे 7.7 लाख डॉलरचे म्हणजेच जवळपास 6.6 कोटी रुपये किमतीचे हिरे अवघ्या सेकंदांत चोराने लंपास केले. हिऱ्याचे झुमके सेकंदात लंपास करणाऱ्या चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले. परंतु, चोराकडे ते झुमके सापडले नाही. पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले व त्या ठिकाणी त्याचा एक्सरे काढला. त्यानंतर त्याच्या पोटात झुमके दिसल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

मंगल-अमंगल! शेअर बाजारात चढ-उतार!!

शेअर बाजारात मंगळवारी दिवसभर चढ-उतार पाहायला मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 32.81 अंकांच्या किरकोळ वाढीसोबत 78,017.19 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 10.30 अंकाच्या वाढीसोबत 23,6668.65 अंकांवर बंद झाला. सकाळी शेअर बाजार उघडला त्यावेळी सेन्सेक्स चांगल्या वाढीसोबत 78,296.28 अंकांपर्यंत पोहोचला होता. तर निफ्टी 23,869.60 अंकांवर पोहोचला होता. परंतु दुपारनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांपैकी केवळ 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसली. तर 20 कंपन्यांना तोटा सहन करावा लागला. निफ्टीच्या 50 पैकी 16 पंपन्यांचे शेअर्स वाढले तर 34 कंपन्यांना तोटा सहन करावा लागला.

‘सिकंदर’ने अॅडव्हान्स्ड बुकिंगमधून 3 कोटी कमावले

अभिनेता सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट येत्या 30 मार्चला प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाची अॅडव्हान्स्ड बुकिंग सुरू असून या चित्रपटाने आतापर्यंत 34 हजार 469 तिकिटांची विक्री केली आहे. यातून या चित्रपटाने 3.32 कोटी रुपयांची कमाई केली आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. ‘सिकंदर’चे पहिल्याच दिवशी देशभरात 5548 शोज होणार आहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच सलमान खान आणि रश्मिका मंदाना एकत्र काम करताना दिसणार आहेत. सध्या विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमागृहात सुरू आहे. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांनी साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केले आहे.

सीएसआयआरमध्ये 209 जागांसाठी भरती सुरू

सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये जवळपास 209 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने ही भरती जाहीर केली आहे. कनिष्ठ सचिवालय सहायक आणि कनिष्ठ स्टेनोग्राफर ही पदे आहेत. कनिष्ठ सचिवालय सहायक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 19,900 ते 63,200 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल, तर कनिष्ठ स्टेनोग्राफरला 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल. उमेदवाराचे वय किमान 18 ते 28 वर्षे असायला हवे. उमेदवारांमध्ये सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गांना वयात सूट दिली जाईल. लेखी परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट crridom.gov.in वर देण्यात आली आहे.