राजौरी येथे 17 जणांचा रहस्यमय मृत्यू झाला. मृत्यूंच्या चौकशीसाठी एम्स आणि पीजीआय चंदीगडचे पथक शनिवारी जीएमसी राजौरी येथे पोहोचले. पथकाने रुग्णांची मेडिकल हिस्ट्री जाणून घेतली. तसेच रुग्णांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांशीही चर्चा केली. दिल्ली एम्समधील 5 डॉक्टरांचे पथक रविवारी बधल गावाला पोचले. ही टीम सीलबंद घरे आणि मृत्यू झालेल्या तीन कुटुंबांच्या आसपासच्या भागातून सॅम्पल घेतील.
कॅबमध्ये स्नॅक्स, वायफाय, अत्तर…
आपण जेव्हा कॅबचे बुपिंग करतो, तेव्हा सुखकर, आरामदायी प्रवास असावा, एवढी इच्छा असते. मात्र त्याहीपलीकडे जात विमानासारख्या सोयीसुविधा कॅबमध्ये उपलब्ध करून देणाऱ्या दिल्लीतल्या उबेर चालकाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अब्दुल कादीर असे या कॅबचालकाचे नाव आहे. त्याच्या कॅबमध्ये स्नॅक्स, वायफाय, अत्तर, औषधे, हॅण्डहेल्ड फॅन, टिश्यू, सॅनिटायजर आणि अॅश ट्रेदेखील आहे. या जबरदस्त सोयीसुविधांसाठी तो कोणतेही जास्तीचे शुल्क आकारत नाही. तसेच राईडही रद्द करत नाही. विमानासारख्या सुविधा देणाऱ्या कॅबचा पह्टो व्हायरल होत आहे.
1 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून डच्चू
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी सत्तेवर येताच धडाधड निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. ट्रम्प सरकारने बांगलादेशला मिळणारी आर्थिक मदत थांबवली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा जोरदार फटका बांगलादेश इंटरनॅशनल सेंटर फॉर डायरियल डिसीज रिसर्चला बसला आहे. एजन्सीने एका झटक्यात या ठिकाणी काम करणाऱ्या 1 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून डच्चू दिला आहे. हे सर्व कर्मचारी युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या मदतीने चालणाऱ्या प्रोग्राममध्ये काम करत होते. अमेरिका सरकारने फंड थांबवला आहे.
तेजश्रीच्या एक्झिटचा मालिकेला फटका
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. आता तिच्या जागी मुक्ता हे पात्र अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारत आहे. मात्र, तेजश्रीच्या एक्झिटमुळे प्रेक्षकांनी मालिकेकडे पाठ फिरवल्याचे दिसते. टीआरपीच्या बाबतीत ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका तिसऱ्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानी आली आहे. अलीकडेच 18 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंतचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. तेजश्री प्रधानने मालिका सोडण्यामागचे कारण अद्याप कारण स्पष्ट केले नाही.
राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान खुले
दिल्लीतील राष्ट्रपती भवनात मुगल गार्डन म्हणजेच अमृत उद्यान आहे. अमृत उद्यान वर्षातून दोनदा सामान्य जनतेसाठी खुले करतात. एकदा पावसाळय़ात आणि एकदा वसंत ऋतूत. यावेळेस 2 फेब्रुवारी ते 30 मार्चदरम्यान अमृत उद्यान खुले राहील. फक्त सोमवारी बंद असेल. हे देशातील सर्वात सुंदर उद्यानापैकी एक आहे. देशभरातून लाखो पर्यटक येतात. हजारो रंगाची फुले आणि हिरवीगार झाडे पाहता येतात. उद्यानाला भेट द्यायची असेल तर आधी रिझर्व्हवेशन करावे लागेल. उद्यान भेटीसाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. राष्ट्रपती भवनाच्या वेबसाईटवर जाऊन बुपिंग करता येईल.