
एक एप्रिल 2025 पासून आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एसबीआय कार्डचे क्लब विस्तारा क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत. यामध्ये माईलस्टोन बेनिफिट्स, तिकीट व्हाऊचर, रिन्यूवल बेनिफिट्स, आणि अनेक विशेष लाभ हटवले जाणार आहेत. आयडीएफसी फर्स्ट बँकेने आपल्या क्लब विस्तारा क्रेडिट कार्ड धारकांना सांगितले की, 31 मार्च 2025 नंतर माइलस्टोन बेनिफिट्स बंद केले जाणार आहेत. तसेच यूजर्सला इकोनॉमी तिकीट व्हाऊचर मिळणार नाहीत.
बीएसएनएलचा 449 रुपयांत अनलिमिटेड डेटा
भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी सर्वात स्वस्त आणि तगडा प्लान आणला आहे. बीएसएनएलच्या या प्लानची किंमत केवळ 449 रुपये आहे. यामध्ये युजर्सला अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि अन्य बेनिफिट्स देत आहे. या प्लानमध्ये एकूण 3300 जीबी हायस्पीड डेटा मिळतो. लिमिट पूर्ण झाल्यानंतर 4 एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळतो. या प्लानमध्ये कोणतीही ओटीटी सेवा उपलब्ध करून दिली जात नाही.
नोकरी! युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 2691 अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवी उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवाराचे वय किमान 20 ते 28 वर्षे असायला हवे. अर्ज पडताळणीनंतर उमेदवाराची लेखी परीक्षा होईल. त्यानंतर त्याची निवड केली जाईल. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती युनियन बँकेची अधिकृत वेबसाइट www.unionbankofindia.co किंवा bfsissc.com वर देण्यात आली आहे.
सोन्याला पुन्हा झळाळी, चांदीही चमकली
सराफा बाजारात सोन्याला आज पुन्हा एकदा झळाळी मिळाली आहे. 24 पॅरेट सोन्याच्या दरात 497 रुपयांची वाढ होऊन सोने प्रति तोळा 85 हजार 817 रुपयांवर पोहोचले आहे, तर चांदीच्या किमतीत आज पुन्हा वाढ होऊन चांदी प्रति किलो 94 हजार 873 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत 22 पॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 78,608 रुपये अशी झाली आहे. 18 पॅरेटसाठी 64361 रुपये, तर 14 पॅरेट सोन्याचा भाव 50 हजार 203 रुपये तोळा झाला आहे.
पाकिस्तानी फायटर जेटचे इंधन टँक कोसळले
पाकिस्तानी हवाई दलाच्या एका फायटर जेटचे उड्डाणावेळी इंधन टँक खाली पडले. ही घटना पंजाबच्या सरगोधा जिह्यातील एका गावात घडली. या ठिकाणाहून एकाचवेळी तीन लढाऊ विमानांनी उड्डाण केले होते, परंतु एका विमानाचे अचानक इंधन टँक खाली पडले. या घटनेमुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. फायटर जेट्सचे इंधन टँक (ड्रॉप टँक) बाहेरच्या बाजूने लावलेले असतात. पाकिस्तानी जेट्सच्या टेक्नोलॉजीवर याआधीही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.