लक्षवेधक – चीनमध्ये 26 लाख जोडप्यांचे जमेना

चीनमध्ये विवाह आणि मुले जन्माला घालण्याबद्दल सातत्याने सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. असे असले तरी 2024 मध्ये 39 वर्षांनंतर सर्वात कमी विवाह झाल्याचे समोर आले आहे. तसेच तब्बल 26 लाख जोडप्यांना घटस्पह्ट हवा असल्याचे उघड झाले आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी केवळ 61 लाख जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे. 2024 मध्ये विवाहांचे प्रमाण 20.5 टक्क्यांनी घसरले आहे.

कम्फर्ट झोन हा तुमचा शत्रू – रकुल प्रीत सिंग

बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने इन्स्टाग्रामवर एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे. प्रत्येकालाच आपला कम्फर्ट झोन कायमच चांगला वाटतो. मात्र कम्फर्ट झोनमुळे आपल्याला कधीच पुढे जाता येत नाही. कम्फर्ट झोन हाच तुमचा शत्रू असून यामुळे कधीच प्रगती होऊ शकत नाही, अशा आशयाच्या पोस्टद्वारे रकुलने तिच्या भावना व्यक्त केल्या. अनेकांना घडत असलेल्या गोष्टींमध्ये बदल नको वाटतो, असेही ती म्हणाली.

वर्क फ्रॉम कार’; पोलिसांची कारवाई

बंगळुरूमध्ये एक महिला कार चालवताना चक्क तिच्या लॅपटॉपवर काम करताना आढळली. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी महिलेवर कारवाई करत तिला दंड ठोठावला. व्हिडीओमध्ये संबंधित महिला गर्दीच्या ठिकाणी ‘वर्क फ्रॉम कार’ करत असल्याचे दिसते. ‘घरातून काम करा, गाडी चालवताना नको,’ असे सांगताना पोलिसांनी चालान जारी केल्याचा फोटोही पोस्ट केला. नेटकऱ्यांनी या घटनेचा दाखला देत उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या.

मिठाईच्या बॉक्समधून दारूची होम डिलिव्हरी

बिहारची राजधानी पाटणा येथे मिठाईच्या बॉक्समधून दारूची होम डिलिव्हरी करणाऱ्या दुकानदाराचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दुकानावर छापा टाकला असता मिठाईच्या बॉक्समध्ये दारू आढळली. याप्रकरणी पोलिसांनी सुदामा कुमार या दुकानदारास अटक केली आहे. तसेच शेकडो लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून दारूची तस्करी करत असल्याची कबुली दुकानदाराने दिली.

अफवा पसरवली; सात खात्यांवर कारवाई

कुंभमेळय़ाबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी सोशल मीडियावरील सात खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गाझीपूरमधील नदीकाठावर सापडलेल्या मृतदेहांच्या जुन्या व्हिडीओला महापुंभातील चेंगराचेंगरीशी जोडून दिशाभूल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी प्रयागराजमधील कोतवाली कुंभमेळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.