‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही या कार्यक्रमाची जादू प्रेक्षकांवर कायम आहे. आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा भेटीला येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याचे कारण म्हणजे कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांनी सोशल मीडियावर दोघांचे एकत्र फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या मागच्या बाजूला व्हॅनिटी व्हॅन दिसतेय. ‘बॅक टू बेसिक…शूटिंगचा दिवस’ असे म्हणत त्यांनी ‘झी मराठी’ला टॅग केले आहे. कुशल-श्रेयाच्या फोटोमुळे ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे, मात्र हे दोन्ही कलाकार ‘चला हवा येऊ द्या’साठी एकत्र आले आहेत की अन्य कोणत्या कार्यक्रमासाठी हे कळू शकले नाही.
तामीळनाडूत जल्लीकट्टूला सुरुवात
तामीळनाडूमध्ये जल्लीकट्टूला आजपासून सुरुवात झाली. पुदुक्कोट्टईच्या गंदार्वकोट्टई तालुक्यातील थाचनकुरिची गावात या वर्षीचा पहिला जल्लीकट्टू सुरू झाला. त्रिची, दिंडीगुल, मानापराई, पुदुक्कोट्टई आणि शिवगंगाई या जिह्यांतील 600 हून अधिक बैलांचा जल्लीकट्टूमध्ये सहभाग आहे. यानिमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुमारे 2500 वर्षांपासून बैल तामीळनाडूच्या लोकांच्या श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहेत. या खेळात बैलाला गर्दीत सोडले जाते. खेळात भाग घेणारे लोक बैलाचा खांदा धरून नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. जो बैलांचा खांदा जास्त काळ धरतो तो विजेता असतो.
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे निधन
जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती टोमिको इत्सुका यांचे वयाच्या 116 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 29 डिसेंबर रोजी ह्योगो प्रांतातील एका नार्ंसग होममध्ये त्यांचे निधन झाले. इत्सुका यांचा जन्म 23 मे 1908 रोजी पश्चिम जपानमधील आशिया शहरात झाला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सप्टेंबर 2024 मध्ये इत्सुका यांना जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून मान्यता दिली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये स्पेनच्या मारिया ब्रान्यास यांचे वयाच्या 117व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर इत्सुका जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनल्या होत्या. आता इत्सुका यांच्या निधनानंतर ब्राझीलच्या इनाह कॅनाबारो लुकास आता जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनल्या आहे. त्या 116 वर्षांच्या आहेत.
एलन मस्कने लाखो शेअर केले दान
टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी कंपनीचे 2 लाख 68 हजार शेअर दान केले. या शेअर्सचे मूल्य अंदाजे 108.2 दशलक्ष डॉलर एवढे आहे. याआधी 2022 मध्ये एलन मस्क यांनी 1.95 अब्ज डॉलरचे टेस्ला शेअर दान केले होते. त्याआधी म्हणजे 2021 मध्ये त्यांनी टेस्लाचे 5.7 अब्ज डॉलरचे शेअर दान केले होते. हे शेअर स्वतःच्याच फाऊंडेशनला दान केल्याचे नंतर उघड झाले होते. टेस्ला कंपनीच्या वार्षिक कर नियोजनाचा भाग म्हणून ही चॅरिटी करण्यात येते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शेअर्स देणगी म्हणून दिल्यानंतरही एलन मस्क जगातील श्रीमंतांच्या यादीत
टॉपवर आहेत.
चीनमध्ये मन वाचणारी मशीन तयार
चीन नवनवीन तंत्रज्ञानाने जगाला धक्का देत असते. असेच एक नवे संशोधन चीनमध्ये करण्यात आलंय. चिनी स्टार्टअप न्यूरोस्पेसने मन वाचणारी मशीन तयार केलेय. न्यूरोस्पेस कंपनीच्या ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) डिव्हाइसने समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे अचूक ओळखले. बीसीआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखादी व्यक्ती आपल्या मेंदूचा वापर करून सॉफ्टवेअर कंट्रोल करू शकते. वस्तू हलवू शकते. एआय मॉडेल्ससोबत चर्चा करू शकते. ऑगस्ट महिन्यात शांघाई येथील फुडान युनिव्हर्सिटीशी संबंधित हुआशान रुग्णालयातील न्यूरोसर्जन्सनी एका 21 वर्षीय महिला रुग्णाच्या डोक्यामध्ये एक लवचिक बीसीआय डिव्हाइस इन्स्टॉल केला.
आरबीआय करणार 50 टन सोन्याची खरेदी
रिझर्व्ह बँक मोठय़ा प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहे. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी सोन्याची खरेदी वाढवण्याचे धोरण आरबीआयने अवलंबले आहे. मार्च 2025 च्या अखेरीस आरबीआयने एकूण 50 टन सोने खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. रिझर्व्ह बँकेने एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान 32.63 टन सोन्याची खरेदी केली. अशाप्रकारे मार्चमध्ये हिंदुस्थानचा सोन्याचा साठा 52.67 अब्ज डॉलरवरून 65.74 अब्ज डॉलर झाला आहे. परकीय चलनाच्या साठय़ाचा भाग म्हणून सोन्याच्या साठय़ाने सप्टेंबरच्या अखेरीस विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखणे सोपे झाले आहे.
कियारा अडवाणीची तब्येत बिघडली
अभिनेत्री कियारा अडवाणी हिची तब्येत बिघडली असून तिला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कियारा आगामी ‘गेम चेंजर’ या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सहभागी होणार होती. मात्र प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. सततच्या कामामुळे आणि दगदगीमुळे कियाराची तब्येत बिघडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती तिच्या टीमकडून देण्यात आली. ‘गेम चेंजर’ या चित्रपटात कियारा आणि राम चरण यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार असून येत्या 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.