सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या सान्निध्यात महाराष्ट्राचा 58 वा वार्षिक निरंकारी संत समागम रविवारपर्यंत पिंपरी येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ‘विस्तार-अनंताच्या दिशेने’ या विषयावर आध्यात्मिक विचारधारेचे दिव्य रूप सजणार आहे. निरंकारी संत समागमचे थेट प्रसारण मिशनच्या वेबसाइट (www.nirankari. org/live) वर जगभरातील अनेक आध्यात्मिक प्रेमींना पाहायला मिळणार आहे. या समागमाचे सर्व व्यवस्थापन संत निरंकारी मिशनच्या सेवादलांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याची माहिती संत निरंकारी मंडळाच्या अध्यक्षा राजकुमारी यांनी दिली.
कवी माधव गायकवाड यांच्या कवितासंग्रहांचे आज प्रकाशन
मुंबई – कवी माधव गंगा दिगंबर गायकवाड यांच्या ’थेट ढगापर्यंत (सोहळा पावसाचा)’, ’ओंजळीतून झिरपताना’, ’शब्दाचं मुक्त अंगण’, ’प्रांजळ इश्कबाजी’ या चार कवितासंग्रहांचे प्रकाशन शनिवार, 25 जानेवारीला होणार आहे. मुंबई महापालिकेच्या परिमंडळ सातच्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. प्रथक प्रकाशनने हे कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत. बोरिवली शाखेच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर सावंत हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध महिला ढोलकीवादक देवयानी मोहळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. हा प्रकाशन सोहळा सकाळी 10.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे, लघु नाटय़गृह, सोडावाला मार्ग, चामुंडा सर्कल, चौथा माळा, बोरिवली येथे होणार आहे.
वाघेरी ग्रामविकास मंडळाची उद्या सभा
मुंबई – वाघेरी ग्रामविकास मंडळाची सर्वसाधारण सभा रविवार, 26 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता, सह्याद्री विद्या मंदिर, श्री छत्रपती शिवाजी महाराज तलाव, भांडुप (पश्चिम) येथे मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तरी ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे सरचिटणीस संतोष मुरलीधर रावराणे यांनी केले आहे.
14 नक्षलवाद्यांना अटक
विजापूर – छत्तीसगडच्या विजापूर जिह्यातून आज 14 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. यापैकी आठ जणांवर एकत्रितपणे 36 लाख रुपयांचे बक्षीस होते. येथील टेकमेटला, नादपल्ली आणि मल्लेमपेंटा गावांच्या जंगलातून पाच महिलांसह एकाला पकडण्यात आले, तर काहींना इतर विविध भागांतून ताब्यात घेण्यात आले.