थोडक्यात बातमी: कुलाबा ते बीकेसी मेट्रो मेपासून, लाडकी बहीण योजनेत बदल नाही

मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेवरील कुलाबा ते बीकेसी या महत्त्वपूर्ण मार्गावर मे 2025 पर्यंत मेट्रो धावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

महाराष्ट्रात मेट्रोची कामे वेगाने सुरू असून ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या मुंबई मेट्रो-3 चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसीदरम्यानची प्रवासी वाहतूक सेवा ऑक्टोबर महिन्यात सुरू झाली आहे. कुलाबा ते बीकेसीपर्यंतचा दुसरा टप्पा मे 2025 पर्यंत खुला करणार आहोत. या टप्प्यामुळे मुंबईला खऱया अर्थाने लाईफलाईन मिळणार आहे. मेट्रो-3 पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर 17 लाख प्रवासी प्रवास करतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पालघर – विरारमध्ये चौथी मुंबई

वाढवण बंदराचा विकास करतानाच वसई-विरार-पालघर भागात चौथी मुंबई उभी केली जाईल. केंद्र सरकारने पालघर विमानतळाची मागणी मान्य केली असून पालघरमध्ये मुंबईचा तिसरा विमानतळ तयार होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेत बदल नाही

लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहील. या योजनेच्या निकषात कोणतेही नवे बदल केले जाणार नाहीत. अधिवेशन संपल्यावर डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा केले जातील, असे फडणवीस म्हणाले.