लक्षवेधक – प्रदर्शनापूर्वीच ‘छावा’ने 2.29 कोटी कमावले

अभिनेता विक्की कौशलचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘छावा’ने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर छाप सोडली आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून 2.29 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘छावा’ या आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे. हिंदी 2डी शोमधून 2.20 कोटी, तर आयमॅक्स 2डी स्क्रीनिंग्समधून 5.79 लाखांची कमाई केली आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त बुकिंग पाहायला मिळाली आहे.

झोमॅटो डिलिव्हरी बॉयची ग्राहकाला मारहाण

गाझियाबादमध्ये एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला. त्याने ग्राहकाला फोन केला, परंतु त्या वेळी ग्राहक दुसऱ्या फोनवर बोलत होता. फोन का उचलला नाही, अशी दमबाजी करत झोमॅटो बॉयने ग्राहकाला मारहाण केली, तसेच स्कॉर्पियो कार आणि दुचाकीची तोडफोड केली, असा आरोप ग्राहकाने केला आहे.

एचडीएफसीचा ग्राहकांना झटका; कर्ज महागले

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केल्यानंतर ग्राहकांचा ईएमआय कमी होईल, असे वाटत असताना एचडीएफसी बँकेने मात्र आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिलाय. एचडीएफसी बँकेने एमसीएलआरमध्ये 5 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. ही वाढ केवळ ओव्हरनाईट पीरियडसाठी लागू आहे. याआधी 9.15 टक्के एमसीएलआर होता. आता तो 9.20 टक्के करण्यात आला
आहे.

पंजाब अँड सिंध बँकेत 110 पदांसाठी भरती

पंजाब आणि सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांच्या 110 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2025 अखेरची तारीख आहे. निवडलेल्या उमेदवारांना बँकेत 3 वर्षे सेवा करावी लागेल. जर त्यांनी तीन वर्षांपूर्वी नोकरी सोडली तर त्यांना बँकेला 3 महिन्यांचा पगार द्यावा लागेल. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिपृत वेबसाईट punjabandsindbank.co.in वर देण्यात आली आहे.