थोडक्यात – सुप्रीम कोर्टात गोळीबार; दोन न्यायाधीशांचा मृत्यू

तेहरानमधील इराणच्या सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात दोन न्यायाधीशांचा मृत्यू झाला. मात्र न्यायाधीशांना त्यांच्या खोलीत घुसून मारण्यात आल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाचे प्रवत्ते असगर जहांगीर यांनी केला आहे. दोन्ही न्यायाधीश राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद आणि हेरगिरीशी संबंधित खटल्यांची सुनावणी करत होते. दोघांनाही गोळ्या घातल्यानंतर हल्लेखोराने स्वतःवरही गोळीबार केला.

…तर सफाई कामगारांसाठी घरे बांधू – केजरीवाल

केंद्र सरकारने अनुदानावर जमीन दिल्यास त्यावर घरे बांधू आणि सुलभ हप्त्यांमध्ये सफाई कामगारांना मालकी हक्क देऊ अशी घोषणा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी केली. दिल्लीतील जमिनीचे प्रकरण केंद्राच्या अखत्यारीत आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले आहे. आम्हाला आशा आहे की, पंतप्रधान हे मान्य करतील. कारण ते गरीबांच्या कल्याणाशी संबंधित आहे असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांची व्हाईट टी-शर्ट मोहीम सुरू

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज गरीब आणि कामगार वर्गासाठी व्हाईट टी-शर्ट मूव्हमेंट मोहीम सुरू केली. पांढरा टी-शर्ट केवळ कापडाचा तुकडा नसून संविधानाच्या रक्षणासाठी आणि न्यायासाठी उभे राहण्याचे प्रतीक आहे असे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज कामगार वर्प प्रचंड दबावाखाली जगत आहे. वाढत्या महागाईने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. कंपन्या नफ्यात आहेत, परंतु त्यांचे उत्पन्न वाढत नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. याबाबत एक्सवरून पोस्ट करण्यात आली आहे.