बेकायदेशीर टपरीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांवर टपरीचालकांनी पोलिसांसमोरच हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली. भालचंद्र घुगे असे हल्ला झालेल्या सहाय्यक आयुक्तांचे नाव असून या घटनेमुळे दिव्यात काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान मुजोर टपरीचालकांनी सहाय्यक आयुक्त घुगे यांना बेदम मारहाण करत धक्काबुक्की केली. अब्दुल्ला शाहआलम व शहाआलम शहाजान खान अशी हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस बंदोबस्तात सहाय्यक आयुक्तांवर हल्ला होत असल्याने कायदा-सुव्यवस्था आहे कुठे, असा प्रश्न दिवावासीयांनी केला आहे.
आज दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे हे कल्याण फाटा येथे बेकायदा टपरीवर कारवाईसाठी जेसीबी, अतिक्रमण विभाग कर्मचारी आणि पोलिसांचा फौजफाटा घेऊन गेले. कारवाई सुरू असताना मुजोर टपरीचालक बाप-लेकांनी त्यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दरम्यान भालचंद्र घुगे हे कारवाईसाठी अतिक्रमण विभागाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पुढे गेले असता या दोघा बापलेकांनी पोलीस आणि अंगरक्षकांच्या समोरच त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी शहाआलम शहाजान खान यांनी घुगे यांना मारहाण केली तर त्यांचा मुलगा अब्दुल्ला शाहआलम याने त्यांना धक्काबुक्की केली.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र पोलिसांसमोरच अधिकाऱ्यांवर होत असलेला हल्ला आणि मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हल्लेखोरांमध्ये पोलीस आणि कायद्याची भीती राहिली आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विकासकाच्या फायद्यासाठी कारवाई केल्याचा आरोप
कल्याण फाटा परिसरात सुरुवातीपासूनच रस्त्याच्या कडेला गाळे होते. मात्र वाढते शहरीकरण आणि इमारतींमुळे हे गाळे तोडण्यात आले. याप्रकरणी काही गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेत स्थगिती आणली. मात्र कोर्टाचा स्टे असतानाही केवळ विकासकाच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचा आरोप गाळेधारकांनी केला आहे.
■ ऑगस्ट २०२१ मध्ये ठाण्यातील माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे कासारवडवली येथील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावरदेखील प्राणघातक हल्ला झाला होता.
■ माथेफिरू फेरीवाला अमरजित यादव याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे तर त्यांच्या अंगरक्षकाचे एक बोट तुटले होते.
■तर काही वर्षांपूर्वी तत्कालीन सहाय्यक आयुक्त संदीप माळवी यांच्यावरदेखील नौपाडा येथील बेकायदा फेरीवाल्यांनी हल्ला करत मारहाण केली होती.