सोमवारी रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात थरारक घटना घडली. सोन्याचे कुरीयर गोव्याला पाठविण्यासाठी रेल्वे टर्मिनस येथे घेऊन निघालेल्या तिघांना रस्त्यात अडवून चौघांनी सोने असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. अखेर एकावर दोन गोळय़ा झाडून 47 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी दोघांना पकडून 16 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
चिराग धंदुकीया व त्याचे नातेवाईक असे तिघे दोन दुचाकीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात होते. दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीकडे सोने असलेली बॅग होती. हे तिघे पी डिमेलो मार्गावरील ब्लू गेटसमोर आले असता मागून दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. त्यानंतर चौघांनी सोन्याची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापटी झाली तरी सराफाने सोन्याची बॅग सोडली नाही. त्यामुळे आरोपींनी त्या सराफावर दोन गोळय़ा झाडल्या. पण गोळी गुडघ्याच्या खाली लागली. गोळी लागल्याने सराफाने बॅग सोडताच आरोपींनी ती घेऊन पोबारा केला. याबाबत तक्रार दाखल होताच माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी तत्काळ तपास करत किरण धनावडे (47) आणि अरुण मढिया ऊर्फ घाची (45) अशा दोघांना पकडण्यात आले. एकाला काळबादेवी तर दुसऱ्याला डोंगरी येथे पकडले. त्यांच्याकडून 16 लाख 50 रुपयांचे सोने हस्तगत केले. दोघा आरोपींचा शोध सुरू आहे. चिराग व त्यांच्या नातेवाईकांना 47 लाखांचे सोने असलेले कुरीयर गोव्याला पाठवायचे होते.