जॉर्डनमधील इस्रायली दूतावासावर गोळीबार; हल्लेखोर ठार

जॉर्डनची राजधानी अम्मानमधील इस्रायली दूतावासावर रविवारी सकाळी गोळीबार झाला. हल्लेखोर बंदूकधाऱयाला पोलिसांनी ठार केले असून या कारवाईत तीन पोलीसही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी दूतावासाच्या आसपासचा परिसर बंद करून घेराव वाढवला. घटनास्थळी पोलिसांची अधिक कुमक आणि रुग्णवाहिकाही पाठवण्यात आल्या. तसेच लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर लोकांचा पोलीस शोध घेत आहेत.  अम्मान येथे इस्रायलच्या विरोधात अनेकदा आंदोलने झाली आहेत. गाझा युद्धानंतर इस्रायलच्या विरोधात अनेक निदर्शने झाली.

इस्रायलच्या हल्ल्यात 20 लेबनॉनी ठार

इस्रायलने शनिवारी रात्री उशिरा लेबनॉनची राजधानी बैरूतवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका निवासी इमारतीला लक्ष्य करण्यात आले. यात 20 जणांचा मृत्यू झाला. हिजबुल्लाहचा टॉप कमांडर मोहम्मद हैदरला मारण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची माहिती इस्रायली अधिकाऱयांनी दिली आहे. दुसरीकडे या हल्ल्यात आपला एकही जण मारला गेला नसल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे. हल्ल्याच्या ठिकाणी त्यांचा एकही कमांडर उपस्थित नव्हता असा दावाही केला आहे. दरम्यान, हल्ल्यात मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात 66 जण जखमी झाले असून त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.