शाहरुख खान धमकी प्रकरण, वकील फैजान खानच्या मोबाईल तपासणीत धक्कादायक माहिती उघड

बॉलीवूड किंग शाहरुख खानला धमकी देत खंडणी मागितल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. रायपूरमधील आरोपी वकील फैजान खान याने धमकी देण्यापूर्वी शाहरुखचे सुरक्षा कर्मचारी आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांची माहिती गोळा केली होती.

आरोपीच्या दुसऱ्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीत मोठे खुलासे झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजानने शाहरुखची सुरक्षा व्यवस्था आणि आर्यन खानबाबत ऑनलाईन माहिती गोळा केली. फैजानने वांद्रे पोलीस स्टेशनचा लँडलाइन नंबर जस्ट डायलद्वारे मिळवला होता आणि धमकीचा कॉल करण्यासाठी त्याचा वापर केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

धमकीचा कॉल करण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल एक आठवड्यापूर्वी म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी खरेदी करण्यात आला होता. फैजानने नवीन फोनमध्ये त्याचे जुने सिमकार्ड वापरल्याची माहिती मिळते. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी त्याने फोन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली, मात्र सिमकार्ड निष्क्रिय केले नाही.

फोन चोरी झाल्यानंतर फैजानने त्यावर कॉल करून ट्रेस करण्याचा प्रयत्न केला नाही. चोरी झालेला फोन पुन्हा मिळवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. चोरीची तक्रार दाखल करण्यापूर्वी आरोपीने या मोबाईलवरून अनेक कॉल केल्याचे कॉल रेकॉर्डवरून दिसून येते.

फैजानने 7 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस स्टेशनच्या लँडलाइनवर कॉल करून शाहरुख खानकडे 50 लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. फैजानने असे का केले याबाबत अद्याप उलगडा झाला नाही. पोलीस फैजानची सखोल चौकशी करत आहेत.