दोन वर्षांत मिंधे-भाजप सरकारने केवळ उद्घाटनांवर महापालिकेचे 50 कोटी उडवले

महाराष्ट्रात अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या मिंधे-भाजप सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महानगरपालिकेच्या विविध अनेक कामांची फक्त उद्घाटने करण्यासाठी तब्बल 50 कोटी रुपये उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विकासकामांच्या उद्घाटनासाठी याआधीच्या वर्षांतील दोन कोटींपर्यंत होणारा खर्च प्रचंड 25 ते 30 कोटींपर्यंत वाढला. विशेष म्हणजे सुशोभीकरण, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गोरेगाव-मुलुंड रस्ता टनेल अशा अनेक कामांची उद्घाटने दोन ते तीन वेळा करून बडेजाव करण्यात आला, मात्र यातील काँक्रिटीकरणासारख्या कामांचा पत्ताच नसून 1700 कोटींची सुशोभीकरण मोहीम गुंडाळण्यात आली आहे.

राज्यात गेल्या अडीच वर्षांत सत्तेत असलेल्या मिंधे-भाजप सरकारने प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू असताना पालिकेच्या कामात प्रचंड हस्तक्षेप केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून सुरू झालेल्या अनेक विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय केवळ आकसातून शिवसेनेने प्रस्तावित केलेली कामे बंद करण्यात आली. तर सुरू झालेल्या कोस्टल रोड, सुशोभीकरण, काँक्रिटीकरण यासारख्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले असताना पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीकेसीमधील मोठ्या कार्यक्रमात करण्यात आला.

पंतप्रधानांच्या रोड शोवर 3.50 कोटी खर्च

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एलबीएस मार्ग ते गांधी मार्पेट या रोड शोदरम्यान एन वॉर्ड आणि एल वॉर्डकडून तब्बल 3.50 कोटींचा खर्च करण्यात आला. लोकसभा आचारसंहिता सुरू असतानाही पालिकेने हा खर्च केल्याने मोठी टीका झाली होती.

‘जीएमएलआर’ बोगद्याच्या भूमिपूजनावर 70.80 लाख

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता मार्गावरील गोरेगाव चित्रनगरी ते खिंडीपाडा (अमर नगर) मुलुंड येथील दुहेरी बोगद्याचे व चित्रनगरीतील पेटी बोगद्याचे कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये यासाठी आयोजित केलेल्या सोहळय़ाचे केवळ भाडेच तब्बल 70 लाख 80 हजार झाला. याबाबतच्या प्रस्तावाला आता स्थायी समिती प्रशासकांनी मंजुरीही दिली आहे.

असा झाला खर्च
2021-22 28 लाख
2022-23 1.80 कोटी
2023-24 28 कोटी
यावर्षी आतापर्यंत सुमारे 20 कोटींवर

महत्त्वाचे प्रकल्पही रखडले

  • सिमेंट रस्ते, खड्डेमुक्त मुंबई झीरो प्रिस्क्रिप्शन सुविधा
  • प्रमुख ठिकाणचा सायकल ट्रक
  • खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प
  • नवी अद्ययावत रुग्णालये
  • मुंबईचे सौंदर्यीकरण, स्वच्छ मुंबई
  • जिजाबाई भोसले उद्यानाचा कायापालट
  • 100 टक्के बेस्ट इलेक्ट्रिक, एसी करणे
  • ‘मागेल त्याला पाणी’ योजना