देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना मनस्ताप देणारा नीट युजी परीक्षा घोटाळा रोखता आला असता, अशी माहिती समोर आली आहे. लातूर येथील नीट आणि इंजीनियरिंग कौन्सिलिंग सेंटरने एप्रिलमध्येच पेपरफुटीच्या गोपनीय कारस्थानाबाबत तक्रार दिली होती. जर त्या तक्रारीच्या आधारे राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएने तातडीने कारवाईची पावले उचलली असती तर परीक्षेतील मोठा घोटाळा रोखता आला असता, असे बोलले जात आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेल्या नीट युजी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने संपूर्ण देशभर विद्यार्थ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. लाखो विद्यार्थ्यांना या गैरव्यवहाराचा फटका बसल्यामुळे अनेक विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढा सुरू केल्यामुळे एटीएस, सीबीआय व इतर तपास यंत्रणा कारवाईत सक्रिय झाल्या आहेत.
चार दिवसांपूर्वीच लातूरमधून काहींना अटक करण्यात आली. परीक्षा घोटाळ्याच्या याच लातूर कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर नवीन माहिती समोर आली आहे. परीक्षेतील पेपरफुटीच्या कटाची एप्रिलमध्येच लातूर येथील नीट आणि इंजिनिअरिंग कौन्सिलिंग सेंटरला कुणकुण लागली होती.
विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीचे परीक्षा केंद्र मिळवून देण्यासाठी काही एजंटसनी हालचाली सुरू केल्याची खबर संबंधित कौन्सिलिंग सेंटरच्या केंद्रप्रमुखांनी एनटीएला दिली होती. मात्र एनटीएने ती माहिती गांभीर्याने घेतली नाही आणि मोठ्या परीक्षा घोटाळा उघडकीस आला. एनटीएने त्या माहितीच्या अनुषंगाने तातडीने कारवाईची पावले का उचलली नाहीत, असा सवाल विद्यार्थ्यांतून उपस्थित केला जात आहे.