मोदींच्या नावाचे ग्रंथालय ? आम्हाला पत्ताच नाही !अधिकाऱ्यांनी केले हात वर…

ठाण्यात मोदींच्या नावाचे ग्रंथालय? आम्हाला पत्ताच नाही अशी कबुलीच ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याची धक्कादायक बाब आज उघडकीस आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने शहरात ग्रंथसंग्रहालय उभारण्यासाठी एक कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. मात्र पालिकेकडे पैसेच नसल्याने अद्याप ग्रंथसंग्रहालय कागदावरच असून पालिका अधिकाऱ्यांनी हात वर केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूश करण्यासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करण्याचा पट्टा सुरू असताना वर्षभरापूर्वी शहरात ग्रंथालय उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी एक कोटींच्या निधीचीही अर्थसंकल्पात तरतूद केली होती. मात्र ग्रंथसंग्रहालय उभारण्यासाठी पैसे नसल्याने इतर योजनेप्रमाणे हादेखील फार्स ठरला असल्याने ठाणेकरांनी नाराजी व्यक्त केली. ठाणे शहराचा मानबिंदू ठरेल असे मध्यवर्ती ग्रंथालय उभे करून त्या ग्रंथालयाचे नाव नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचे नियोजित करण्यात आले होते.

आमदार संजय केळकरांनी आयुक्तांना विचारला जाब

भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आज पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांना जाब विचारला. ग्रंथसंग्रहालय उभारणीसाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा, या कामात दिरंगाई होता कामा नये, असा सज्जड दम केळकर यांनी दिला. पालिकेचे अधिकारी काही ठिकाणी अवास्तव खर्च करतात तसे नको तिकडे पैसे खर्चुन वास्तू उभ्या केल्या असल्याचा आरोप केळकर यांनी केला.