खंडणी प्रकरणातील अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याचा धक्कादायक मृत्यू, पोलिसांनी दिली घटनेची माहिती

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणी वाल्मीक कराड अटकेत आहे. आता याच प्रकरणाशी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांनी खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या आवादा कंपनीच्या कामगाराचा केज येथे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रचपाल हमीद मसीह, असं या मृत कामगारांचे नाव असून तो पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे.

रचपाल हमीद मसीह मृत्यू नेमका कशामुळे झाला? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. याचाच खुलासा पोलिसांनी केला आहे. रचपाल याचा मृत्यू साप चावल्याने झाला, अशी माहिती बीड एसपी नवनीत कावंत यांनी दिली आहे. मात्र ही प्राथमिक माहिती असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. खंडणी प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.