‘जंगलाचा राजा’ गुजरातमध्ये असुरक्षित; अवघ्या दोन वर्षांत 286 सिंहांचा धक्कादायक मृत्यू

गुजरात राज्यात गेल्या दोन वर्षांत किमान 286 सिंहांचा मृत्यू झाला असून त्यात 143 बछडय़ांचा समावेश आहे, अशी माहिती गुजरातच्या वनमंत्र्यांनी विधानसभेत सादर केलेल्या अहवालातून उघड झाली आहे. काँग्रेस आमदार शैलेश कुमार परमामर यांच्या प्रश्नाला वनमंत्री मुलुभाई बेरा यांनी लेखी उत्तर दिले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच गीर अभयारण्याला भेट देऊन सिंह सफारीचा आनंद घेतला. परंतु गुजरातच्या विधानसभेत मांडण्यात आलेल्या सिंहांच्या मृत्यूच्या धक्कादायक अहवालानंतर सिंहांच्या संवर्धनासाठी पंतप्रधान मोदी कोणती भूमिका घेणार की नुसते सिंहासोबत पह्टो काढणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

वनमंत्री मुलुभाई बेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 आणि 2024 या दोन वर्षांत राज्यात 456 बिबटे, 140 बछडे यांचाही मृत्यू झाला आहे. 286 सिंहांपैकी 2023 मध्ये 121, तर 2024 मध्ये 165 सिंहांचा मृत्यू झाल्याचे बेरा यांनी सांगितले. जगात आशियाई सिंह गुजरातमध्ये आहेत. जून 2020 च्या गणनेनुसार गुजरातमध्ये 674 आशियाई सिंह आहेत. राज्यात बिबट्यांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. 2023 मध्ये 225 बिबटे, तर 2024 मध्ये 231 बिबट्यांचा मृत्यू झाला.

228 सिंहांचा नैसर्गिकरीत्या, तर 58 सिंहांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. तसेच विहिरींमध्ये पडून आणि वाहनांच्या धडकेतसुद्धा अनेक सिंहांचा मृत्यू झाल्याचे बेरा यांनी सांगितले.

बिबट्यांमध्ये 303 बिबट्यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या, तर 153 बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे बेरा यांनी सभागृहात सांगितले.