
भाजपच्या स्थापना दिना निमित्ताने भाजपमधील गटबाजी खुलेपणाने समोर आल्याचे बघायला मिळाले. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्ये हे चित्र बघून ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका, अशा कानपिचक्या दिल्या.
भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने चंद्रपूरमध्ये पक्षातील गटबाजी खुलेपणाने समोर आली. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमधले हे चित्र बघून ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कानपिचक्या दिल्या. pic.twitter.com/Y38GXlIOO6
— Saamana Online (@SaamanaOnline) April 6, 2025
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले. मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात, तर जोरगेवार यांनी कन्यका सभागृहात स्थापना दिनाचा कार्यक्रम घेतला. जोरगेवार यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित होते. एकाचवेळी एकाच पक्षाचे एकाच शहरात दोन कार्यक्रम झाल्याने कार्यकर्त्यांची गोची झाली. कोणत्या नेत्याकडे जावे, या संभ्रमात कार्यकर्ते सापडले.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील शीतयुद्ध जोरात रंगू लागले. मुनगंटीवार यांना मंत्रीपद मिळू नये, यासाठी भाजपच्या याच स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने मुनगंटीवार हे जोरगेवार, अहिर आणि शोभा फडणवीस यांच्यावर संतापलेले आहेत. त्यांच्या कार्यक्रमात मुनगंटीवार जाणे अशक्यच असल्याचे बोलले जात होते आणि झालेही तसेच. मुनगंटीवार यांनी आपला स्वतंत्र कार्यक्रम घेतला. तर दुसरीकडे शोभाताई यांनी मुनगंटीवार यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली. त्यांनी या कार्यक्रमात यायला हवे होते, असे म्हणतानाच आपल्या पक्षाचा काँग्रेस करू नका, असा टोला त्यांनी लगावला. यामुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा उफाळून आल्याचे दिसून आले.
View this post on Instagram