शिवशाही म्हाडाकडून संक्रमण शिबिराचे भाडे वसूल करणार

पावसाळ्यात धोकादायक इमारतीमधील गरजू रहिवाशांचे स्थलांतर करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने आपल्या संक्रमण शिबिरातील 726 घरे म्हाडाला विनामूल्य दिली होती. मात्र आता घरांचे भाडे मिळावे यासाठी शिवशाही प्रयत्न करणार आहे, अशी माहिती शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची मुलुंड, भांडुप, कुर्ला, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली आणि बोरिवली अशा 16 ठिकाणी 5 हजार घरे आहेत. यातील 300 चौरस फुटांची 34 घरे वगळता इतर सर्व घरे 225 चौरस फुटांची आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी शासनाच्या निर्देशानुसार शिवशाहीने आपली 726 घरे म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाला मे महिन्याच्या शेवटी दिली. सदरची घरे म्हाडाला शिवशाहीकडून विनामूल्य मिळाली असली तरी म्हाडा मात्र संक्रमण शिबिराच्या मोबदल्यात गाळेधारकाकडून 500 रुपये, तर घुसखोराकडून 3 हजार रुपये आकारते. त्यामुळे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पदेखील आता म्हाडाला पत्र पाठवून भाड्याची मागणी करणार आहे.

घुसखोरी रोखण्याचे आव्हान

म्हाडाच्या संक्रमण शिबिरात मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. घुसखोरांना बाहेर काढणे ही म्हाडासाठी मोठी डोकेदुखी ठरते. त्यातच आता शिवशाहीकडून मिळालेली शेकडो घरे सांभाळण्याचे आणि त्यातील घुसखोरी रोखण्याचे मोठे आव्हान म्हाडापुढे असणार आहे.